राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारांना कोरोनाचा संसर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारांना कोरोनाचा संसर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा

विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यासमवेत त्यांचा वाहन चालकही पॉझिटिव्ह आला आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या दोन चार दिवसांत त्यांच्या संपर्कातील लोकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच क्वारंटाईन रहावे, असे आवाहन आमदार भुसारा यांनी केले आहे.

कोरोनाच्या महामारीतसुद्धा आमदार भुसारा हे सतत लोकांच्या संपर्कात असून शासकीय अधिकार्‍यांच्या बैठका, भेटी, कार्यकर्ते यांच्यासोबत गावखेड्यात पाहणी दौरे, लोकांच्या घराघरात दारात पोहचणे, शेतीची पाहणी करणे, सतत रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र कोवीड सेंटर यांचीही पाहणी करीत होते. अशातच मागील महिनाभरापूर्वी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने जास्त धोका असल्यामुळे ते कार्यकर्त्यांसोबत क्वारंटाईन झाले होते. त्यावेळी त्यांच्या अंगरक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

यानंतर पुन्हा ते सक्रीय झाले होते. गेल्या आठवड्यात पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबतच्या दौर्‍यानंतर ते मंत्रालयीन कामासाठी मुंबई येथे गेल्यानंतर त्यांना ताप खोकला झाल्याने मुंबईतच जे. जे. रुग्णालयात सर्व तपासण्या केल्या असता कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. यानंतर ते आपल्या घरी आले. मात्र तरीही ताप कमी होत नसल्याने त्यांनी दोन दिवसांनी कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आल्याने सोबतच्या सहकार्‍यांचीही चाचणी केली असता चालकही पॉझिटिव्ह आला आहे.

First Published on: September 21, 2020 11:54 PM
Exit mobile version