नीट आणि जेईईची परीक्षा होणारच

नीट आणि जेईईची परीक्षा होणारच

केंद्र सरकार नीट आणि जेईईची परीक्षा घेण्यावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. येत्या १ सप्टेंबरपासून या परीक्षा सुरू होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. जेईई परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी केंद्रांची संख्या ५७० इतकी होती. ती आता ६६० इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नीटच्या परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. २ हजार ५४६ वरून नीटच्या परीक्षा केंद्रांची संख्या ३ हजार ८४२ इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची केंद्र देण्यात आली आहेत, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नीट व जेईई परीक्षाही केंद्र सरकारनं पुढे ढकलली होती. अखरे ही परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले असल्याचे दिसत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री म्हणाले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांनी मला माहिती दिली आहे की, जेईई परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या ८.५८ लाख विद्यार्थ्यांपैकी ७.५ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहेत, तर नीटसाठी अर्ज भरलेल्या १५.९७ लाख विद्यार्थ्यांपैकी १० लाख विद्यार्थ्यांनीही प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहे. हे कार्ड २४ तासांत डाऊनलोड करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचीच अशी इच्छा आहे की, कोणत्याही किमतीत परीक्षा घ्याच, असेच यातून दिसून येते, असे पोखरियाल म्हणाले.

कोरोनामुळे नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर १ ते ६ सप्टेंबरदरम्यान या परीक्षा घेण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निश्चित केले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळून लावत परीक्षा घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर अजूनही परीक्षेला होणारा विरोध मावळलेला नाही. मात्र, केंद्र सरकार परीक्षा घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

First Published on: August 27, 2020 11:12 PM
Exit mobile version