वृत्तपत्र विक्रेता ओंकारला नाणी जमवण्याचा छंद, शेतमांगरातील खोलीत भरवलं प्रदर्शन

वृत्तपत्र विक्रेता ओंकारला नाणी जमवण्याचा छंद, शेतमांगरातील खोलीत भरवलं प्रदर्शन

सिंधुदुर्ग : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं. तसंच जशा व्यक्ती वेगवेगळ्या तसे त्यांचे छंद ही असं म्हटल्यास वावगं ठरू नये. असाच आपल्या अनोख्या छंदाला अगदी प्रतिकूल परिस्थिती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालमधील ओंकार कदम जोपासत आहेत. बालपणापासून नाणी जमा करण्याची त्याला आवड लागली. तो आजपर्यंत ही आवड जोपासत आहे. त्याची ही आवड कधी छंद बनला हे त्यालाही समजले नाही.

ओंकार घरोघरी वृत्तपत्र विक्री करतो आणि त्यासोबत आपल्या राहत्या घरापाठीमागच्या शेतमांगरातील खोलीत एक छोटे संग्रहालय सुरू करत त्याने आपल्या छंद म्हणून जमवलेल्या नाणी आणि नोटांचं प्रदर्शन मांडलं आहे. ज्यामध्ये त्याने १८५ देशांच्या चलनी नोटा, शिवकालीन नाणी, इ. स. ३०२ व्या शतकापासून अनेक भारतीय सम्राटांनी आपापल्या काळात चलनात आणलेली नाणी आणि त्याचा इतिहासही सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे.

ओंकारला विविध देशांचे चलन जाणून घेऊन त्याचा अभ्यास करण्याची खूप आवड आहे. हा अभ्यास करता करता त्याने काही देशांच्या चलनी नोटा आणि नाणी जमवली आहेत. आपल्यासारखेच आपल्या वयाच्या युवकांना म्हणा किंवा शालेय विद्यार्थ्यांना, आपल्या देशासह विविध देशांच्या चलनांचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने त्याने मोठ्या प्रमाणावर विविध देशांच्या नोटा आणि नाणी जमवण्यास सुरुवात केली.

याबरोबरच त्याने इ. स. पूर्व काळामध्ये चलनी नाण्यांचा वापर करणाऱ्या भारतीय राज्यकर्त्यांचा त्यांच्या साम्राज्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. जमा केलेल्या या नोटा, नाणी विद्यार्थ्यांना दाखवता यावी व अभ्यासता यावी, यासाठी त्याने आपल्या घरापाठीमागच्या शेतमांगरात या नाणी आणि नोटांचं छोटंसं संग्रहालय सुरू केलं. या संग्रहालयात शिवकालीन नाणी, मोघलकालीन नाणी, एवढेच नव्हे तर ज्या ज्या भारतीय सम्राटांनी या देशावर कित्येक वर्षे राज्य केले, त्या प्रत्येक सम्राटाच्या कारकिर्दीतील चलनी नाणी आहेत. शिवछत्रपतींच्या काळातीलही नाणी त्याने जतन केली आहेत.


हेही वाचाः आदित्य ठाकरेंच्या पर्यावरणाविषयी मोठ्या जाहिराती पण झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष, आशिष शेलारांची टीका

First Published on: June 5, 2022 6:05 PM
Exit mobile version