जागते रहो रात्र वैऱ्याची! पुढील १५ दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे

जागते रहो रात्र वैऱ्याची! पुढील १५ दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून अलीकडच्या काही दिवसांपासून राज्याच्या कोरोना रुग्ण संख्येत सुमारे २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे असतील, असा इशारा आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे. प्रशासनाने कोरोना परतल्याचे गांभीर्य ओळखून नागरिकांवर निर्बंध आणण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात ३१ हजार ४७९ इतके कोरोना रुग्ण होते. हा आकडा वाढून आता ४५ हजारच्या घरात पोहचला आहे. यामुळे राज्याची चिंता वाढलीय. एकट्या मुंबईतच कोरोना रुग्ण वाढीमध्ये तब्बल ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरात एकूण ८२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरनंतर प्रथमच एवढी मोठी वाढ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना विषाणूचे ३ लाख १७ हजार ३१० रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ११ हजार ४३५ रूग्णांना आपला प्राण गमावावा लागला आहे.

त्यामुळे येत्या १५ दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये आणखी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये वाढीचे कारण शोधण्यासाठी पुढील दोन आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ७०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला हा आकडा ५०० च्या खाली होता.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागातील तापमानात घट झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढीमागे हे कारण असू शकतं, अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच, कोरोना विषाणूच्या सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली

मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पण, फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या अन्य राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागच्या आठवड्यात केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. शुक्रवारी संपूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार १२७ कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. मागच्या सात दिवसात केरळमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. देशभरातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना केसेसपैकी फक्त महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातूनच ७५.८७ टक्के कोरोना रुग्ण असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे मागच्या २४ तासात देशातील १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.

First Published on: February 21, 2021 4:00 AM
Exit mobile version