CycloneNisarga: रायगडसाठी १०० कोटींची मदत जाहीर

CycloneNisarga: रायगडसाठी १०० कोटींची मदत जाहीर

रायगडसाठी १०० कोटींची मदत जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड दौरा केला. उद्धव ठाकरे यांनी चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींची मदत जाहीर केली आहे. नुकसान भरपाई, किंवा इतर गोष्टी तातडीने केल्या जातील. रायगड जिल्ह्यासाठी तातडीने १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. ज्यांची घरं पडली आहेत, त्यांना प्राधान्य देऊन ती कामं केली जातील. रायगडप्रमाणेच इतर नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये देखील काम करण्याची काळजी आपण घेत आहोत. पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून १०० कोटींची मदत जाहीर करत आहोत. ताबडतोब जे काही नुकसानग्रस्तांसाठी करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने कोणत्याही आदेशाची वाट न पाहता कामाला सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर पुढील मदत राज्य सरकार जाहीर करेल,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – स्थलांतरित मजुरांना १५ दिवसांत घरी पोहोचवण्यात यावं, सुप्रिम कोर्टाचे निर्देश


“आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच रायगडमध्ये यावं लागलं. निसर्गाचं रौद्ररुप आपण पाहिलं पण रायगडने ते अनुभवलं आहे. ती दृष्य भीतीदायक होती. रायगडमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी मी इथे आलो आहे. जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घेण्याचं काम प्रशासनाचं असतं. पण दुर्दैवाने सहा जणांचा मृत्यू झाला. पैसे देता येतात पण घरातली गेलेली व्यक्ती परत येत नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. हे नुकसान भरून येणारं नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार. कोरोना संकट आहेच,काळजी घेतली त्यात वादळ आलं,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे. प्रथम झाडांची साफसफाई करावी,आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल.

 

First Published on: June 5, 2020 3:27 PM
Exit mobile version