…तरीही काँग्रेसने आम्हाला स्वीकारलं नाही, राजकीय प्रवासाबाबत नितेश राणेंचा दावा

…तरीही काँग्रेसने आम्हाला स्वीकारलं नाही, राजकीय प्रवासाबाबत नितेश राणेंचा दावा

भाजप आमदार नितेश राणे हे आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कारण नितेश राणे हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सतत टीका करत असतात. त्यामुळे ते राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतात. नितेश राणे यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मूळचे शिवसेनेतले आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरूवात ही शिवसेनेपासून झाली. नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले होते. परंतु २००६ ते २००७ च्या दरम्यान त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळी आम्ही १२ वर्ष काँग्रेसमध्ये असलो तरी काँग्रेसने आम्हाला कधीच स्वीकारलं नाही, असा दावा नितेश राणे यांनी केला.

नितेश राणे हे आपल्या राजकीय प्रवासाबाबत एबीपी माझ्याच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते. भाजपातील सक्रीय सहभागाबद्दल विचारलं असता नितेश राणे म्हणाले की, भाजपात आम्ही रुळलोय. कारण आम्ही १२ वर्ष काँग्रेसमध्ये असलो तरी काँग्रेसने आम्हाला कधीच स्वीकारलं नाही. तिथे कायम आम्हाला राणे समर्थक मानलं जायचं किंवा राणे हे वेगळेच आहेत असं म्हटलं जायचं. परंतु भाजपाने आम्हाला परिवार म्हणून स्वीकारलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.

मी २००६ पर्यंत लंडनमध्येच होतो. त्यावेळी मी आईला सांगितलं मला इथेच राहायचं आहे, यासाठी काही करता येईल का? पण मला व्हिसा मिळाला नाही. मग मला परत यावं लागलं. मला परत यायची ओढ नव्हती. पण वडिलांची इच्छा होती शिक्षणानंतर मी परत यावं आणि येथे काम करावं. त्यानंतर मी २००६-०७ च्या दरम्यान भारतात परत आलो. तेव्हा साहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता, असंही नितेश राणे म्हणाले.

२००६-०७च्या दरम्यान, नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर जवळपास १२ वर्ष राणेंनी काँग्रेसमध्ये काम केलं आणि काही वर्षांनी त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. परंतु हा पक्ष २०१९ मध्ये राणेंनी भाजपात विलीन केला आणि भाजपच्या तिकीटावर नितेश राणे हे कणकवलीतून आमदार झाले.


हेही वाचा : अभिजीत पाटील राष्ट्रवादीत; भाजपशी जवळीक असूनही पवारांच्या गळाला


 

First Published on: May 7, 2023 6:03 PM
Exit mobile version