महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा हवा, भाजपा आमदाराची मागणी

महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा हवा, भाजपा आमदाराची मागणी

मुंबई : शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक शिवसेना आमदारांनी ‘उठाव’ करत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. आज त्यांनी दहिहंडी आणि गणेशोत्सवावरील निर्बंध हटविले. त्याच अनुषंगाने आता राज्यात भगवाधारी सरकार आल्याने धर्मांतरविरोधी कायदा हवा, अशी मागणी भाजपाच्या एका आमदाराने केली आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. ‘आता महाराष्ट्रात भगवाधारी सरकार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांप्रमाणे राज्यातही धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची हीच वेळ आहे,’ असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा, गुजरात, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, जबरदस्तीने केलेले धर्मांतर दंडनीय अपराध असेल. यामध्ये एका वर्षापासून १० वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे १५ हजार ते ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. लग्नासाठी केलं जाणारं धर्मांतरही या कायद्यांतर्गत अमान्य करण्यात आलं आहे.

हाच संदर्भ घेत नितेश राणे यांनी हे ट्विट केले आहे. भोळ्या महिलांना यामध्ये अडकण्यापासून तसेच त्याद्वारे होणाऱ्या छळपासून आपण वाचले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: July 21, 2022 10:09 PM
Exit mobile version