माझ्याकडे असलेली पत्रं लवकरच छापतो; सामनाच्या अग्रलेखानंतर नितेश राणेंचा सेनेला इशारा

माझ्याकडे असलेली पत्रं लवकरच छापतो; सामनाच्या अग्रलेखानंतर नितेश राणेंचा सेनेला इशारा

शिवसेनेच्या सामनातून आज राणे कुटुंबावर निशाणा साधण्यात आला. संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असतं. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचं असतं, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत,” असा खोचक टोला सामनातून लगावला. आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत, असा अप्रत्यक्षपणे टोला विखे आणि नारायण राणेंना लगावला. यावर नितेश राणेंनी प्रतिउत्तर दिलं आहे. माझ्याकडे असलेली पत्रं लवकरच छापतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत आपल्याकडील पत्रं प्रहारमधून छापण्याचा इशारा शिवसेनेला दिला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सामनाचं आमच्यावर प्रेम आहे. असणारच..का नाही असणार शेवटी ओल्ड इज गोल्ड. पण, काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचं पण नाही. काही “पत्रं”आहेत माझ्याकडे. तळकोकणच्या प्रहार मधुन लवकरच छापतो. मग बघु कशी कुरकुर होते.” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी अजून एक ट्विट करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले की फडणवीसांबद्दल उलट बोलायचं. राणेंना भेटले की ठाकरेंबद्दल उलट बोलायचं. ठाकरेंना राणेंबद्दल उलट बोलायचं. राज्यपाल भेटले की पवारांबद्दल उलट बोलायचं. असं करून स्वतःची किंमत संपवली! ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक!” अशा आशयाचे ट्विट नितेश राऊत यांनी केलं.


हेही वाचा – महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसलेत; सामनातून विखे पाटील, राणेंना टोला


 

 

First Published on: June 22, 2020 2:52 PM
Exit mobile version