घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या विरोधी पक्षात 'बाटगे' घुसलेत; सामनातून विखे पाटील, राणेंना टोला

महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसलेत; सामनातून विखे पाटील, राणेंना टोला

Subscribe

काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची 'टूर ऍण्ड ट्रॅव्हल' कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय! असा टोला देखील विखे पाटलांना लगावला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सध्या कलगीतुरा सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर “एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत,” असा टोला विखे पाटलांनी थोरांतांना लगावला होता. यावर बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रत्युत्तर देत “मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे,” असा उलट टोला विखएंना लगावला. यावर आता शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून विखेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

बाळासाहेब यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर विखेंकडून कोणतंही विधान आलेलं नाही. हा धागा पकडत सामनातून विखेंवर निशाणा साधला आहे. “काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे. विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात,” असा टोला हाणला आहे.

- Advertisement -

“विखे हे सध्या काँग्रेस पक्षात नाहीत. ते सध्या ज्या पक्षात आहेत त्याबाबत त्यांनी बोलावं. पण सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे त्याच तडफडणार्‍या माशांचे प्रतिनिधी आहेत. संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असतं. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचं असतं, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत,” असा खोचक टोला सामनातून लगावला. या बाटग्यांमुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे, असा टोमणा मारला आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत, असा अप्रत्यक्षपणे टोला विखे आणि नारायण राणेंना लगावला आहे. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आल्याच देखील त्यात म्हटलं आहे.


हेही वाचा – जशास तसे उत्तर देण्याचे आदेश

- Advertisement -

“महाराष्ट्राचं ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला आणि तो पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय! असा टोला देखील विखे पाटलांना लगावला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -