जेवढा विजेचा वापर तेवढंच बिल अदा करता येणार, घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरची योजना

जेवढा विजेचा वापर तेवढंच बिल अदा करता येणार, घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरची योजना

जेवढा विजेचा वापर तेवढंच बिल अदा करता येणार, घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरची योजना

राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना ऊर्जा कंपनीकडून लवकरच स्मार्ट मीटर मिळणार आहे. मोबाईल सीमकार्डप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आणि प्रीपेडमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांना जेवढा वीज वापर असेल तेवढे बिल अदा करावे लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश दिले. घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही राऊत यांनी दिल्या.

डॉ.आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्याचा विचार अनुसूचित जाती आणि जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही नितीन राऊत यांनी या बैठकीत दिले. गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीज जोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करण्याची सूचनाही राऊत यांनी दिली.

स्मार्ट वीज मीटरचे फायदे

मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल.

वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रिपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.

स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये छेडछाड करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल.

स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पध्दतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येईल.

First Published on: July 20, 2021 7:16 PM
Exit mobile version