पंचवटीतील प्रतिबंधित क्षेत्राची आयुक्तांनी केली पाहणी

पंचवटीतील प्रतिबंधित क्षेत्राची आयुक्तांनी केली पाहणी

नाशिक शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पंचवटीतील फुलेनगर, रामनगर, पेठरोड परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र व मेरी येथील करोना कक्षाची शनिवारी (दि.२७) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथक, पोलीस आणि स्थानिक नगरसेवकांसह पाहणी केली.

आरोग्य तपासणी करताना हायरिस्क, लो रिस्क व ओपीडीमध्ये येणारे रुग्ण यांच्या सर्व तपासण्या करून योग्य ते उपचार करावेत. परिसरातील रहिवाशांना होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करावे, सार्वजनिक शौचालयांमध्ये होमिओपॅथिक औषधे फवारणी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त गमे यांनी आरोग्य विभागास दिल्या. तसेच नागरिकांची जनजागृती करण्याच्या दृष्टीने पदाधिकार्‍यांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त गमे यांनी केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील पेठरोड परिसरातील रामनगर ते फुलेनगर बसस्टॉप परिसरात बॅरिकेटींग लावून प्रतिबंधित करण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. मेरी येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी यावेळी करण्यात आली. कोविड केअर सेंटरसह इतर कोविड केअर सेंटर परिसरात महापालिकेकडून केले जाणारे उपचार, सुविधा व नियमावलीचे फलक लावावेत. ण्याच्या मेरी येथील करोना कक्ष येथे सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त गमे यांनी दिल्या.

यावेळी गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक गुरुमीत बग्गा, नरेश पाटील, शंकर हिरे, उल्हास धनवटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी विवेक धांडे, करोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, उपअभियंता प्रकाश निकम, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, सुनील थाळकर आदी उपस्थित होते.

रूग्णालयांत खाटांची संख्या पुरेशी
रूग्णालयात दाखल झालेले रुग्ण लवकर बरे होण्यात योग्य ते उपचार केले जात असून पुरेसे कॅलरीजयुक्त अन्न दिले जात आहे. शहरात जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी केली जात असून आवश्यकतेनुसार स्वॅब घेतले जात आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असून घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढली तरी त्यांच्यासाठी रुग्णालयांत खाटांची संख्या पुरेशी आहे, असे आयुक्त गमे यांनी सांगितले.

First Published on: June 27, 2020 9:24 PM
Exit mobile version