ऐतिहासिक निर्णय; दीक्षांत समारंभातून काळा डगला हद्दपार!

ऐतिहासिक निर्णय; दीक्षांत समारंभातून काळा डगला हद्दपार!

Convocation ceremony

अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ सर्वार्थाने वेगळा असणार आहे. येत्या २० डिसेंबर रोजी होणा-या दीक्षांत समारंभात इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेल्या गाऊनचा त्याग करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

दीक्षांत समासंभाच्या पोशाखात बदल

या दीक्षांत समारंभाविषयी सांगताना चांदेकर यांनी असे सांगितले, येत्या २० तारखेला सकाळी १० वाजता ३५ वा दीक्षांत समारंभ सुरु होणार आहे. या समारंभाला भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेचे (इस्त्रो) वैज्ञानिक पदमविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यंदा विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहाच्या मान्यवरांच्या पोशाखात बदल करण्यात आलाय. इंग्रजांच्या काळापासून चालत आलेल्या गाऊन आणि टोपीचा त्याग करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असणार पोशाख

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे वेषभूषा बदलण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या दीक्षांत समारंभात कुलगुरू आणि मुख्य अतिथींचा पोशाख त्यांच्या आवडी प्रमाणे राहणार असून पुरुष वर्गासाठी पांढरा जोधपुरी सूट आणि काळे बूट तर महिलांकरिता काठाची पांढरी साडी आणि ब्लाउज अशी वेशभूषा राहणार आहे. अमरावती विद्यापीठ स्थापनेला ३५ वर्ष पूर्ण झाली असून विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालये आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभागांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना ज्ञानदानाचे कार्य सातत्याने होत आहे. अमरावती विभागातील ३८० महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्नित आहेत.

मुलींनी मारली बाजी

या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना १०३ – सुवर्णपदके, २२ – रौप्यपदके आण २४ – रोख पारितोषिके असे एकूण १४९ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभामध्ये पदकांसाठी मुलींनी बाजी मारली असून १४९ पदकांपैकी मुलींनी १२७ पदके मिळविली आहे. यामध्ये सोनाली खडसे या विद्यार्थीनीने सर्वाधिक सुवर्ण – ६ आणि रोख – १ पारितोषिक प्राप्त केल्याचे चांदेकर यांनी सांगितले.

First Published on: December 18, 2018 10:08 PM
Exit mobile version