लॉकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही – डॉ. राजेंद्र शिंगणे

लॉकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही – डॉ. राजेंद्र शिंगणे

राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक सामान, औषधे, सॅनिटायझर, मास्क इत्यादी बाजारात उपलब्ध होतील. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही व मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया व कर्करुग्णांना रक्ताचा तुटवडा होणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

सध्या जागतिक स्तरावर तसेच देशात व राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे अधिकारी स्वःताच्या जीवाची पर्वा न करता काळजीपूर्वक या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी कार्यरत आहे. या सर्व बाबींवर अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे लक्ष देऊन आहेत.

औषध प्रसाशन विभागाने २४ मार्चला रक्तपेढींच्या प्रतिनिधींची,  तज्ज्ञांची,  बीटीओ (B.T.O.) व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर राज्यातील प्रत्येक रक्तपेढीने त्यांच्याकडील रक्ताच्या उपलब्धते बाबतची माहिती दिल्यानंतर ती माहिती संकलित करण्यात येत आहे. माहिती गोळा केली आहे. तसेच रक्तांच्या युनिटची उपलब्धतेची तसेच वितरण केल्याची माहिती उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत रक्ताचा तुटवडा होणार नाही, यासाठी गरजेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत रक्तदात्यांना शिबिराच्या ठिकाणी येण्यात अडचणी येणार नाही, यासाठी पोलीस व जिल्हाधिकारी स्तरावर आवश्यक सहकार्य प्राप्त करण्यासाठी कळविण्यात आले आहे. त्यानुसार व्हॉटसअप ग्रुपवर रक्तपेढीकडून अद्यावत माहिती उपलब्ध होत आहे. रक्तपेढ्यांकडे पुढील २० दिवस रक्त पुरवठा करता येईल इतका साठा उपलब्ध आहे.

औषधांचा पुरवठा सुरळीत

सध्या सॅनिटायझर व मास्कचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने या वस्तूंचे निर्माते व पुरवठादार यांच्या कडूनही त्यांच्याकडून उत्पादन व पुरवठा होत असलेल्या सॅनिटायझर व मास्कची तपशीलवार माहिती घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एक पथक तयार केले आहे व त्यांच्याकडून दर दिवशी साठ्याबाबतची माहिती घेतली जात आहे. सॅनिटायझर्स, मास्क, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, अझिथ्रोमाइसिन, एरिथ्रोमाइसिन, अँटीवायरल ड्रग्स इत्यादीच्या उत्पादनासाठी लागणारे कच्चे माल, पॅकिंग मटेरियल, मनुष्यबळ आदी राज्यातील उत्पादकाकडे उपलब्ध आहे का? राज्यात उत्पादन केलेल्या व इतर राज्यातून येणाऱ्या या औषधाचे वितरण योग्यरीत्या होत आहे का? या बाबतची माहिती घेण्यासाठीही प्रशासनाने एक पथक तयार केले असून रोजची माहिती घेण्याबाबत व यात येत असलेल्या अडचणी तसेच कामगारांना कामावर येण्यासाठी होत असलेली अडवणूक, मालवाहक वाहनास होणारी अडवणूक, इ. चे निराकरण करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. औषध प्रशासनाची विविध पथके व प्रशासकीय अधिकारी हे युद्धस्तरावर काम करीत आहे.

इथले नोंदवा तक्रार

जनतेला त्यांच्या तक्रारी  प्रशासनाकडे तात्काळ नोंदविणे शक्य होईल यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यानसोबत व सचिव स्तरावरून बैठक आयोजित करून 25 मार्चपासून प्रशासनाच्या मुख्यालयात २४ X ७ तास कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. तसेच टोल फ्री क्रमांक  1800222365 वर तक्रार नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

First Published on: April 7, 2020 9:35 PM
Exit mobile version