मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली अनलॉकमध्ये कोरोनाला दूर ठेवण्याची त्रिसुत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली अनलॉकमध्ये कोरोनाला दूर ठेवण्याची त्रिसुत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरसिंग

“अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळवणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्याप्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे”, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा कोरोनाविषयक आढावा घेताना ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

माझे कुटुंब- माझी जबाबदारी या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरु झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत, यामध्ये कोरोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची पोस्ट कोविड स्थिती याबाबत माहिती घेत आहेत. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘मास्क नाही प्रवेश नाही’

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ यासारख्या अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला.

पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशीही ठाकरे यांनी संवाद साधला. यापुढे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजचे आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबवायला हवा.

काही लोकांच्या बेपर्वाईमुळे संसर्ग वाढतोय

ठाकरे पुढे म्हणाले, काही लोकांच्या बेपर्वाईमुळे संसर्ग वाढते आहे. यासाठी गृह विलगीकरण आणि गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतून नागरिकांच्या तपासणीबरोबरच त्यांना आरोग्य शिक्षण मिळणे गरजचे आहे. निरोगी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सक्रीय व्हावे. जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

First Published on: September 25, 2020 11:10 PM
Exit mobile version