अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर राजकारण नको!

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर राजकारण नको!
उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे राजकीयकरण अत्यंत निंदनीय आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व अनिश्चितता निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षांच्या विषयावर राजकारण करण्याऐवजी सर्वसहमतीने निर्णय घेण्याची गरज आहे, असे आवाहन स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने (एसआयओ) राज्यपाल आणि सर्व राज्य विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांना पत्राद्वारे केले आहे.

जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व आरोग्यास प्राधान्य दिले पाहिजे आणि परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय त्या अनुषंगाने घ्यावा, असे संघटनेने आपल्या पत्रात नमूद करताना विद्यार्थ्यांना फक्त अंतिम सत्रच नव्हे तर सर्व सत्रांमधील त्यांच्या कामगिरीच्या आधारे पदवी दिली जाते. म्हणून सर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे एकसमान नियम हवे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे विलगीकरण करून फक्त त्यांना परीक्षेला बसवणे अन्यायकारक आहे. कोविड -१९ च्या प्रादुर्भावची परिस्थिती नियंत्रणात आल्यास आणि शैक्षणिक संस्था जुलैच्या मध्यापर्यंत पुन्हा सुरू होण्याच्या स्थितीत असले तर कोणतीही परीक्षा (मधले वर्षांसह) रद्द केली जाऊ नये आणि परीक्षेच्या ३० दिवसांच्या आत सर्व निकाल घोषित करणे आवश्यक आहे. परंतु यापुढे आरोग्याचा त्रास कायम राहिल्यास सर्व परीक्षा रद्द करावीत आणि सरासरी गुणांच्या आधारे निकाल लावण्यात यावा, असे म्हटले आहे.

राज्य सरकारने सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तरीही अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत अनिश्चितता आहे. या प्रकरणाचे राजकीयकरण केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणखी भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षपात करण्याऐवजी एकमत होण्याची गरज आहे, असे एसआयओ दक्षिण महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद सलमान म्हणाले.

First Published on: June 6, 2020 7:25 PM
Exit mobile version