मुंबईत पाण्यासाठी आणीबाणी, नागरिकांची उडाली तारांबळ

मुंबईत पाण्यासाठी आणीबाणी, नागरिकांची उडाली तारांबळ

जल अभियंता खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता भांडूप संकुलाशी संबंधित जलवाहिनी दुरुस्ती व बदली बाबत हाती घेतलेली कामे आणखीन ८ तासांनी उशिराने पूर्ण करण्यात आल्याने पूर्व व पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. अगोदर मंगळवारी सकाळी १० वाजता व त्यानंतर काम लांबल्याने सायंकाळी ६ नंतरही पूर्ववत न झाल्याने पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या उपनगरवासीयांचे पिण्याच्या व पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी आवश्यक पाण्याकरिता हाल हाल झाले.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम सायंकाळी ६ पर्यन्त पूर्ण झाले तरी तलावातून पाणी जलवाहिनीत सोडणे, सोडलेले पाणी विविध ठिकाणी असलेल्या जलाशयात साठविणे, जलाशयाची लेवल साध्य करून मग छोट्या जलवाहिनीद्वारे घरोघरी, सोसायटीत पाणीपुरवठा सुरळीत होण्यास रात्री उशिरापर्यन्त वेळ लागणार याची माहिती मिळाल्यावर उपनगरवासीयांच्या पायाखालची जमीन सरकली. मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ३० जानेवारी रोजी भांडूप संकुलशी संबंधित जलवाहिनी बदलणे, गळती दुरुस्तीची मोठी कामे हाती घेतली. त्यामुळे मुंबईतील १२ विभागात ३० जानेवारी रोजी सकाळी १० पासून ते ३१ जानेवारी रोजी सकाळी १० पर्यंत म्हणजे २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

‘ जी/उत्तर’ आणि ‘जी/दक्षिण’ या २ विभागातील माहीम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी व माटुंगा (पश्चिम) या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी रोजी २५ टक्के कपात करण्यात आली. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. याबाबतची माहिती जल अभियंता खात्याने मुंबईकरांना अगोदरच देऊन पाणीसाठा करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

मात्र काही लोकांना पाणीबाणीबाबत पुरेशी माहिती नव्हती. विशेषतः झोपडपट्टी परिसरातील काही नागरिकांना सोमवारी सकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत म्हणजे २४ तास व त्यापेक्षाही जास्त वेळ पाणी बंद असणार याची माहिती नसल्याने त्यांना नाईलाजाने नजीकच्या इमारती, सोसायटीमध्ये अगोदरच साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून २ – ४ हांडे पाणी पिण्यापुरता मागून घेऊन स्वतःसह कुटुंबियांची तहान भागवावी लागली.

झोपडपट्टीवासीयांना पाणीबाणीचा फटका

अनेक नागरिकांना ( ज्यांच्या घरी पाणीसाठा अधिक साठविण्याची सोय नाही असे नागरिक) अंघोळीशिवाय कामावर जावे लागले. तर काहींनी फक्त तोंड, हातपाय धुतले व कामासाठी कंपनी, कार्यालय गाठल्याचे ऐकायला मिळाले. तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही कशीबशी अंघोळ उरकून घरातून जावे लागले. महिलांना तर सकाळी जेवणाचा डबा बनविणे, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण बनविण्यासाठी भाजीपाला धुणे, रात्रीच्या जेवणाची, सकाळच्या नाश्त्याची व दुपारच्या जेवणाची भांडीकुंडी धुणे, आवश्यक कपडे धुणे यासाठी थोडेफार भरून ठेवलेले पाणी वापरणे व त्यानंतर पुन्हा पुढील कामांसाठी पाणी उपलब्ध करणे कठीण झाले. विशेषतः झोपडपट्टीतील महिलांना अगदी पुरुष मंडळींना, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही हांडाभर, कळशीभर पाण्यासाठी भटकावे लागले. अनेकांनी तर बाटलीबंद बिस्लरीचे पाणी विकत घेऊन आपली व कुटुंबियांची तहान भागविल्याचे ऐकायला मिळाले.

उपनगरात ज्या ठिकाणी सकाळ किंवा दुपारच्या सत्रात अथवा सायंकाळी ६ पूर्वी एक तास, दोन तास पाणीपुरवठा केला जातो, अशा ठिकाणी नियोजनाप्रमाणे सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपुरवठा न झाल्याने त्यांना त्यांच्या वेळेत पाणीपुरवठा होणे कठीण झाले. त्यांना आता बुधवारी त्यांच्या वेळेतच पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. तोपर्यंत तरी त्यांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागले.

जास्त पैसे देण्याची तयारी दर्शवूनही पाण्याचे टॅंकर मिळेना

महापालिकेचे जलवाहिनी दुरुस्तीचे काम एक दोन नव्हे तर चक्क आठ तासांनी लांबल्याने व त्यामुळे सकाळी १० ऐवजी सायंकाळी ६ वाजता पाणीपुरवठा होणार असल्याने तोपर्यंत साठवलेले पाणी संपल्यास पाण्याची पुढील सोय करण्यासाठी काही सोसायटीवाल्यांनी पाण्याच्या टॅंकरची मागणी पालिकेकडे व खासगी पाणी विक्रेत्याकडे ( टॅंकरवाल्यांकडे) अगदी जास्त पैसे देण्याची तयारी दर्शवून केली. मात्र आडातच पाणी नसल्याने पोहऱ्यात पाणी येणार कुठून म्हणजे जलाशयातच ( पाण्याच्या टाकीत) पाणीसाठा नसल्याने टॅंकरमध्ये पाणी भरून कुठून देणार ? अशी उत्तरे मिळाल्याने ते हताश, हतबल झाले.

पाणीबाणीमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या पोटावर पाय

रस्ते, पदपथ, चौक, सोसायटी आवार आदी ठिकाणी हातगाडी, छोटे स्टॉल लावून वडापाव, अंडा भुर्जी, पावभाजी, पाणीपुरी, चायनीज आदी खाद्यपदार्थ यांची आज विक्री करून त्यातून मिळणाऱ्या कमाईवर जगणाऱ्यांचे पिण्याचे पाणी ३० तासापेक्षाही जास्त काळ उपलब्ध न झाल्याने त्यांच्या व्यवसायाला त्याचा मोठा आर्थिक फटका बसला. खाद्यपदार्थ खाल्ल्यावर पिण्यासाठी पाणी नसल्याने अधिकाधिक ग्राहकांनी सदर खाद्यपदार्थ खरेदी करणे टाळले.

तसेच, रस्ते, पदपथ याठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू, कपडे, भाजीपाला आदींची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनाही पिण्याच्या पाण्याचा मोठा फटका बसला. जेवताना व जेवल्यावर तहान भागविण्यासाठी बाटलीबंद बिस्लरी पाण्याची खरेदी करावी लागल्याचे समजते.

रात्री उशिराने पाणीपुरवठा : महापालिका

महापालिका जलाभियंता खात्याने सोमवारी भांडुप संकुलशी निगडित जलवाहिनी बदलणे, गळती बंद करून दुरुस्तीची ८ ठिकाणची कामे व मालाड, बोरिवली, वांद्रे येथील जलाशयाशी संबंधित ३० कामे सोमवारी सकाळपासून हाती घेतली होती. त्यासाठी ५०० कामगार, १०० इंजिनिअर, अधिकारी , यंत्रणा रविवारी रात्रीपासूनच कामाला लावली होती. मात्र भांडूप संकुलातील वॉटर ट्रिटमेंट प्लांट गेल्या ४२ वर्षात प्रथमच दुरुस्ती कामांसाठी हाती घेतल्याने, जलवाहिनीवर जुने व्हॉल्व्ह असल्याने, डी वॉटर, टी पासिंग आणि काही तांत्रिक अडचणी आदीमुळे नियोजित कामे होण्यास २४ तास ऐवजी अधिक ८ तास वेळ लागला. मात्र सर्व कामे यशस्वी झाली. आता तलावांमधून तानसा, वैतरणा मुख्य जलवाहिनी व बोरिवली आणि मालाड टनेलमध्ये भरणे, तेथून ते पाणी ठिकठिकाणच्या जलाशयात पोहचविणे व ते जलाशय भरणे यासाठी वेळ लागणार आहे त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा रात्री उशिरापर्यन्त होऊ शकेल, अशी माहिती प्रमुख जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.


हेही वाचा : सर्वसामान्यांचे सरकार, आम्हाला नुसतं खेळवतायत.., अजित पवारांनी सांगितला कॉलचा किस्सा


 

First Published on: January 31, 2023 7:58 PM
Exit mobile version