सत्ता गेल्याने भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणीच पुढे येईना

सत्ता गेल्याने भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणीच पुढे येईना

सत्ता गेल्याने भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणीच पुढे येईना

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसावे लागलेल्या भाजपमध्ये आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या घटली आहे. सत्ता गेल्याने अनेकांनी प्रदेशाध्यक्ष पद नको रे बाबा असेच म्हटल्याचे भाजपमधील खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे दिल्लीत गेल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता कार्यकाळ संपला असून, येत्या १५ जानेवारीपर्यंत भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. मात्र आता या पदासाठी भाजपमध्ये कुणीच इच्छूक नसल्याने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्याच गळ्यात महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडू शकते असे सूत्रांनी खासगीत बोलताना सांगितले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चढाओढ लागली होती. या पदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांनी लॉबिंग देखील सुरू केले होते. पण आता चंद्रकांत पाटील वगळता बाकीच्या नेत्यांनी नको रे बाबा प्रदेशाध्यक्ष पद असाच सूर लावल्याचे समजत आहे.

म्हणून चंद्रकांत पाटील होणार प्रदेशाध्यक्ष 

या अगोदर विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र आता हे नेते देखील अनुत्सुक असल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येणार आहे. त्यातच संघाने देखील संघाशी जवळीक असलेल्या नेत्याकडे पक्षाची जबाबदारी द्यावी असे सांगितले आहे. एवढेच नाही तर चंद्रकांत पाटील हे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय असल्याने दिल्लीतून देखील चंद्रकांत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, येत्या १५ जानेवारी पर्यंत चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष निवडले जाणार असून, त्यानंतर लगेच म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत भाजपचा महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष निवड होणार आहे.


हेही वाचा – काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील स्वतःचेच कार्यालय फोडले


 

First Published on: December 31, 2019 7:00 PM
Exit mobile version