चूक नसताना मला माफी मागायला सांगितली; सत्यजित तांबे यांचा खळबळजनक खुलासा

चूक नसताना मला माफी मागायला सांगितली; सत्यजित तांबे यांचा खळबळजनक खुलासा

नाशिकः कॉंग्रेस पक्षातून ए बी फॉर्म भरला नसल्याने माझा अर्ज अपक्ष म्हणून स्विकारला गेला. त्यानंतर मी कॉंग्रेसचा पाठिंबा मागितला. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मला पाठिंब्यासाठी माफी मागण्यास सांगितले. माझी चूक नसताना मला माफी मागण्यास सांगण्यात आले, असा खळबळजनक खुलासा डॉ. सत्यजित तांबे यांनी शनिवारी केला.

ते म्हणाले, सन २०३० मध्ये कॉंग्रेसला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. मी आणि माझे कुटुंब कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. मी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष होतो. त्याचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपला. त्यानंतर मी पक्षाकडे दुसरी जबाबदारी मागितली. मला आमदार नाही व्हायचे. पण मला दुसरी काही तरी जबाबदारी द्या.मला काम करायचे आहे, असे मी वारंवार प्रभारी एच. के. पाटील व पक्षश्रेष्ठींना सांगत होतो. मात्र तुमच्या घरात तुमचे वडिल आमदार आहेत. त्यामुळे तुम्हाला दुसरी जबाबदारी देता येणार नाही, असे मला सांगण्यात आले.

त्यानंतर मला वडिलांच्या जागी निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला.  त्यावेळी माझा संताप झाला. मी २२ वर्षे पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे माझी स्वतःची ओळख आहे. मला वडिलांच्या जागी निवडणूक लढणे मान्य नव्हते. त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्यास तयार नव्हतो. माझ्या वडिलांनी मला समजावले की मी थांबतो तू निवडणूक लढवं. त्यानंतर मी निवडणूक लढवण्यास तयार झालो, असे डॉ. सत्यजित तांबे यांनी सांगितले.

माझी उमेदवारी आधीच जाहिर करु नका, असे आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. तरीही माझ्या वडिलांच्या नावे सुधीर तांबे यांचा ए बी फार्म पाठवण्यात आला. ही चुकही मी पक्षाच्या निदर्शनास आणले. तरीही मला वेळेत ए बी फार्म देण्यात आाला नाही. त्यानंतरही मी कॉंग्रेसचा पाठिंबा मागितला. पाठिंब्यासाठी दिल्लीतून मला माफी मागण्यास सांगण्यात आले. माझी चुक नसताना मला माफी मागण्यास सांगण्यात आले. मी माफी मागण्यास तयार झालो. तसे पत्रही दिले. तरीही महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला, असे डॉ. तांबे यांनी सांगितले.

First Published on: February 4, 2023 5:34 PM
Exit mobile version