दारुसाठी आता टोकन सिस्टम

दारुसाठी आता टोकन सिस्टम

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सोमवारपासून राज्यातील वाईन शॉप सुरू करण्याचा राज्य शासनाने निर्णय जाहीर केल्यानंतर दारुसाठी मद्यपींनी अक्षरश: गर्दी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. ही गर्दी टाळण्यासाठी आता प्रत्येक वाईन शॉपमध्ये टोकन सिस्टम सुरू होणार असून दिवसाला फक्त चारशे लोकांना दारू मिळेल असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे वेळेच्या बचतीसह सोशल डिस्टन्सिंगचे लोकांकडून आपोआप पालन होईल असे सांगण्यात आले.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताच राज्य शासनाने मुंबईसह राज्यात लॉकडाऊन जाहीर केले होते. नंतर इतर राज्यातही लॉकडाऊन जाहीर झाले होते. यादरम्यान सर्व बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आणि वाईन शॉप बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सोमवारी अखेर शासनाने काही अटी शिथिल करून वाईन शॉप सुरू करण्यास मंजुरी दिली होती. मात्र अनेकांनी दारुसाठी इतकी गर्दी केली की तिथे गोंधळ होऊ लागला, सोशल डिस्टन्सिंगचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत होते. त्यामुळे त्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेत सर्व वाईन शॉप मालकांना दारू खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना टोकन देण्याचा सल्ला दिला आहे.

दिवसभरात केवळ चारशे लोकांना दारुसाठी टोकन देण्यात यावे. त्यासाठी एका तासाला पन्नास टोकन द्यावे असा आदेश दिला. टोकन देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. दिवसाला फक्त चारशे लोकांना दारू मिळेल याची जबाबदारी वाईन शॉप मालकावर असेल. दारू देताना ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही याचीही मालकांनी पाहणी करावी. यासाठी संबंधित विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी वाईन शॉपजवळ साध्या वेशात गस्त घालणार आहेत. ग्राहकांसह वाईन शॉपच्या मालकांना त्रास होऊ नये, सर्वांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे यासाठी ही टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे.

दिल्लीत दारूवर ७० टक्के अधिभार
मद्यप्रेमींसाठी दारुची दुकाने खुली करताना दिल्ली सरकारने दारूवर ७० टक्के तर आंध्र प्रदेशने ५० टक्के अधिभार लावला आहे. त्यातून मिळणारा महसुलामुळे करोनाच्या काळात रिक्त झालेली संबंधित राज्य सरकारांची तिजोरी भरण्यास मदत होणार आहे. दारू विक्रीमुळे दरवर्षी महाराष्ट्राला २६हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. लॉकडाऊननंतर पहिल्याच दिवशी राज्यात ५ लाख लिटर दारूची विक्री झाली आहे.

First Published on: May 6, 2020 6:51 AM
Exit mobile version