नव्या पेपरमध्ये जुन्या अभ्यासक्रमातील प्रश्न

नव्या पेपरमध्ये जुन्या अभ्यासक्रमातील प्रश्न

13 डिसेंबरला मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एमएससीच्या तिसर्‍या सेमिस्टरच्या स्टॅस्टिकल मेकॅनिक्स या विषयाच्या पेपरमध्ये जुन्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीत राबवण्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रश्नपत्रिकेत वारंवार चुका करून आपल्याच दाव्याला मुंबई विद्यापीठाकडून हरताळ फासण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाकडून एमएससीच्या (फिजिक्स) तिसर्‍या सत्रात स्टॅस्टिकल मेकॅनिक्स या विषयाचा पेपर 13 डिसेंबरला घेण्यात आला. पेपर सोडवत असताना अनेक प्रश्न लिहिण्यात विद्यार्थ्यांचा अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न हे न शिकवलेल्या अभ्यासक्रमावर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर कॉलेजमधील प्राध्यापकांशी संपर्क साधत त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यावेळी प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिक तपासली असता अनेक प्रश्न हे जुन्या अभ्यासक्रमातील असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रश्नपत्रिका व विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटवरील सांकेतिक क्रमांकही वेगळा असल्याचे लक्षात आले.

प्रश्नपत्रिकेमध्ये तब्बल 27 गुणांचे प्रश्न हे जुन्या अभ्यासक्रमातील असल्याचे प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. स्टॅस्टिकल मेकॅनिक्स विषयाची परीक्षा यावर्षी बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आली आहे. परंतु जुन्या अभ्यासक्रमातील 27 गुणांचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत आल्याने विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जुन्या अभ्यासक्रमातील प्रश्नाबाबत परीक्षेला बसलेल्या रुपारेल, सिध्दार्थ, रतनाम आणि आर.डी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक विनोद पाटील यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

महिनाभरापूर्वी झालेल्या सिव्हील इंजिनियरिंगच्या सर्व्हेयिंग 1 विषयाच्या पेपरमध्ये 20 गुणांचा प्रश्नच न छापण्याचा प्रकार ताजा असतानाच एमएससीच्या तिसर्‍या सेमिस्टरच्या स्टॅस्टिकल मेकॅनिक्सच्या पेपरमध्ये जुन्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारल्याने पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

जुन्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकेसंदभातील अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर त्याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ही प्रश्नपत्रिका तीन ते चार केंद्रांवरच गेल्यामुळे सर्व केंद्रांवरील विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले नाही.
– विनोद पाटील, संचालक, परीक्षा भवन, मुंबई विद्यापीठ

परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नांचे गुण देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून याला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
– प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेना

First Published on: December 15, 2019 7:00 AM
Exit mobile version