मराठी तरुणाचे  वन रुपी क्लीनिक आता उत्तर-पूर्व रेल्वे स्थानकांवरही

मराठी तरुणाचे  वन रुपी क्लीनिक आता उत्तर-पूर्व रेल्वे स्थानकांवरही

ठाणे ।   मुंबई सारख्या वर्दळ असलेल्या मध्य असो किंवा पश्चिम या रेल्वे स्थानकावरून सुरू झालेला “वन रुपी क्लीनिक” च्या इंजिनाला आता थेट महाराष्ट्राबाहेरही वन रुपी क्लीनिक नावाचे डब्बे जोडले जाणार आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्याच्या उत्तर पूर्व रेल्वे मार्गांवरील तब्बल ९ रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लीनिक (मॅजिक दिल हेल्थ ) सुरू करण्याची परवानगी तेथील रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे सर्वाधिक आरोग्य सेवेची गरज असलेल्या त्या राज्यांमधील रेल्वे स्थानकांवर रुग्ण सेवा देण्यासाठी वन रुपी क्लीनिक सज्ज झाली आहे. यातुन तेथील स्थानिकांना रोजगार दिला आहे. यामुळे मराठी तरुणाच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमी आहे.

गरजूंना तात्काळ रुग्ण सेवा मिळावी, या उद्देशाने २०१७ साली मराठी तरुण असलेले डॉ.राहुल घुले यांनी माफक दरात म्हणजे अवघ्या एका रुपयात रुग्णांना सेवा देणारी “वन रुपी क्लीनिक” (मॅजिक दिल) या नावाच्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. मध्य आणि पश्चिम अशा दोन लोकल सेवा सुरू असणाऱ्या कुर्ला या एकाच रेल्वे स्थानकावर पहिले- वाहिले वन रुपी क्लीनिक सुरू केले. अवघ्या पाच वर्षात या क्लीनिकचा पसारा वाढून मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गांवर तब्बल ३० क्लीनिक सुरू झाले. याचदरम्यान या क्लीनिकच्या माध्यमातून ५ लाखांहून अधिक रुग्णांना सेवा दिली गेली. तसेच रेल्वे अपघातात जखमी झालेल्या ३ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांना तात्काळ आणि मोफत उपचार करून त्यांना जीवनदान दिली.

तर रेल्वे प्रवासात १५ ते २० महिला प्रवासींची प्रसूती केली. अशाप्रकारे रुग्ण सेवा देणाऱ्या या वन रुपी क्लीनिकची चर्चा महाराष्ट्राबाहेर गेल्याने या कंपनीला उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्याच्या सीमांवरील ( उत्तर पूर्व या रेल्वे मार्गांवर) तब्बल ९ रेल्वे स्थानकांवर रुग्ण सेवा देण्यासाठी आमंत्रित केले आहे. एकीकडे रोजगारासाठी सर्व राज्यांचा ओढा हा महाराष्ट्रातील मुंबईत जास्त असताना, आता मुंबईत रुग्ण सेवा देणारी कंपनी उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील स्थानिकांना रोजगार देण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबईत दिला २०० जणांना रोजगार
या कंपनीने क्लीनिक च्या माध्यमातून २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. यामध्ये डॉक्टर, नर्सेस आणि फार्मासिस्ट आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये ही १०० जण किंवा त्यापेक्षा स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

”  सेवा ध्येय ठेवून ही कंपनी सुरू केली. या कंपनीला महाराष्ट्राबाहेर संधी मिळाली आहे. तेथेही स्वस्त दरात आरोग्य सेवा देणार आहोत. तसेच तेथील स्थानिकांना रोजगार ही देण्याचा प्रमुख्याने प्रयत्न करणार आहे. नुकतीच तेथे क्लीनिक सुरू करण्याची परवानगी मिळाली असून येत्या नव्या वर्षात म्हणजे २०२३ या वर्षात क्लीनिक त्या मार्गांवर सुरू होतील. “- डॉ राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लीनिक

अशी आहेत रेल्वे स्थानके
प्रयागराज रामबाग, ज्ञानपुर, बनारस, गाझीपुर सिटी, बल्लीआ, छप्परा, सिवान, मऊ आणि डोरिअ सादर

First Published on: November 29, 2022 5:01 PM
Exit mobile version