कांद्याने गाठली शंभरी, हॉटेलमधूनही गायब!

कांद्याने गाठली शंभरी, हॉटेलमधूनही गायब!

महिनाभरापासून कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने कांदा खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. बाजारात पुन्हा आवक घटल्याने कांद्याने शंभरी गाठली आहे. बाजारात कांद्याचा दर वेगवेगळा असल्याने ग्राहकांची पंचाईत होत असताना विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. सामान्यांना रडवत असलेला कांदा हॉटेलच्या डिशमधूनही गायब झाला आहे. त्यामुळे कांद्याची साठेबाजी करणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

लांबलेल्या पावसामुळे यावर्षी कांदा पीक धोक्यात आले. राज्यात इतर पिकांसह कांद्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे बाजारातील कांदा दिसेनासा होत आहे. याचा परिणाम शिल्लक कांद्याचा दर वाढण्यात झाला आहे. घटलेली आवक आणि कांद्याचा तुटवडा यामुळे कांद्याने प्रमुख शहरात शंभरी पार केली आहे. याचा फटका शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. गेले काही दिवस शहरात कांद्याचा दर ३५ ने वाढत जाऊन अगदी १०० रुपयांपर्यंत गेला आहे. रविवारी आलेला नवीन कांदा ४५, तर जुना कांदा ८५ रुपये दराने विकला जात होता. हिच अवस्था रायगड जिल्ह्यातील अन्य शहरांत देखील दिसून येत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना कांद्याने चांगलेच रडवले असले तरी नाइलाजास्तव कांदा ४५ च्या पुढेच खरेदी करावा लागत आहे. याचा फायदा साठा करून ठेवलेल्या विक्रेत्यांना होत आहे. यामुळे शहरात विविध दुकानात कांद्याचे वेगवेगळे दर आहेत. यामुळे साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वाढलेल्या दरामुळे हॉटेलमधून कांदा गायब झाला आहे. विविध डिशमधून दिला जाणारा कांदा आता दिला जात नाही. शिवाय कांदाभजी हॉटेलमधून गायब झाली आहे. ८५ ते ९५ रुपये प्रति किलोपर्यंत कांदा खरेदी करून २५ ते ३० रुपये प्लेट दराने कांदा भजी देणे परवडण्याच्या पलीकडे गेले आहे.

काही ठिकाणी हॉटेल चालकांनी कांदा दिला जाणार नाही, मात्र हवा असल्यास एका कांद्यामागे १५ रुपये द्यावे लागतील, अशा आशयाचे फलक लावले आहेत. सध्या पावभाजी, मिसळ आदी खाद्य पदार्थांबरोबर कांद्या ऐवजी कोबी दिला जातो. लग्नसराई आणि विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असल्याने कांद्याचीही वाढती मागणी सुरू झाली आहे. कांद्याची आवक जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत हा दर अजून काही दिवस तरी असाच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

First Published on: November 26, 2019 2:56 AM
Exit mobile version