अकरावी विद्यार्थ्यांचेही आता ऑनलाईन वर्ग

अकरावी विद्यार्थ्यांचेही आता ऑनलाईन वर्ग

कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता ११वी साठीची प्रवेशप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. ११ वीच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालये सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी २ नोव्हेंबरपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. सकाळी ८.४० पासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाईन वर्गासाठी १ नोव्हेंबरला सायंकाळपर्यंत तब्बल ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक नोंदणी केली आहे.

कोरोनामुळे विलंबाने सुरू झालेली व मराठा आरक्षणामुळे स्थगिती आल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा झाला आहे. महाराष्ट्रातील १८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यातील अंदाजे ११ लाख विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्गासाठी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया यंदा स्थगितीमध्ये अडकल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग २ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाईन वर्गामध्ये पहिली तासिका सकाळी ८.४० ते ९.२० वाजेपर्यंत असणार आहे. तर दुसरी तासिका सकाळी ९.३० ते १०.१० वाजेपर्यंत आणि तिसरी तासिका सकाळी १०.२० ते ११ वाजेपर्यंत होणार आहे. ऑनलाईन तासिकांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://covid१९.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना परिषदेकडून करण्यात आल्या होत्या. या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाचे वेळापत्रकही देण्यात आले आहे.

१ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राज्यभरातून तब्बल ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आर्ट्ससाठी ६८६४, कॉमर्ससाठी १८,३११, सायन्ससाठी ३५,१८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन वर्ग गुगल क्लासरूम किंवा झूम, यूटयुब लाईव्हच्या माध्यमातून होणार आहे. हे वर्ग नि:शुल्क असणार आहेत. ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना तासिकांचे वेळापत्रक व आवश्यक तपशील वेळोवेळी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर सुद्धा माहिती पाठवण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया होऊन व नियमित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू होईपर्यंत हे ऑनलाईन वर्ग चालणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या हितासाठीच सरकारने अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात केली आहे. घरात राहूनच आरोग्याबरोबर शिक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.
– प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
First Published on: November 2, 2020 4:50 PM
Exit mobile version