नेरळ बाजारपेठेत गुटख्याची खुलेआम विक्री

नेरळ बाजारपेठेत गुटख्याची खुलेआम विक्री

राज्यात शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी देखील येथे बाजारपेठ आणि परिसरात पान टपर्‍यांवर त्याची सर्रास विक्री होत आहे. अलीकडे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पकडलेला गुटख्याचा साठा मातीत गाडला असतानादेखील परिसरात गोडावूनमधून साठा करण्याचे धारिष्ट्य दाखविले जात आहे.

नेरळ हे माथेरानचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असून, पुणे-मुंबई मार्गावरील येथील रेल्वे स्थानकातून माथेरानला जाण्यासाठीही मिनीट्रेन सोडली जाते. अशा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यावर महाराष्ट्र राज्यात बंद असलेला गुटखा तात्काळ उपलब्ध होतो. स्टेशनच्या बाहेर एका गल्लीत गुटखा पोहोच करणारे दुकान असून, त्या घाऊक दुकानदाराचे नेरळ गावाच्या बाहेर मोठे गोडावून आहे. तेथून सर्व भागात गुटखा पोहचविला जात असतो. स्थानकासमोरील गल्लीत गुटख्याची ऑर्डर दिली की तात्काळ तासाभरात गुटखा पोहचत असतो. त्याचवेळी बाजारपेठ भागातील अनेक ठिकाणी गुटखा विक्रेते असून त्यातील अनेक व्यापारी हे गुटख्याची पाकिटे खिशात ठेवूनदेखील फिरतात. गिर्‍हाईकाने गुटख्याची मागणी केली की जादा भाव आकारून त्याची पाकिटे दिली जातात. हे सर्व होत असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही.

दुसरीकडे शहर आणि परिसरात असलेल्या दुकानदारांना घाऊकमध्ये गुटख्याची विक्री करणारा एकच विक्रेता असून, त्याच्याकडून कळंबपासून कशेळे आणि खांडस या भागात गुटखा पोहोच केला जातो. त्यासाठी या गुटखा विक्रेत्याने आपले गोडावून कोल्हारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारले आहे. शासनाने बंदी आणलेला तंबाखू-सुपारी मिश्रित गुटख्याची सर्रास विक्री होत असताना संबंधित विक्रेत्याला कोणीही अडवताना दिसत नाही. पोलिसांप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही दरारा नसल्याने विक्रेते बिनधास्त असल्याचे दिसत आहे. मात्र याच्यामागे काही ‘अर्थ’ दडला असावा, अशी गुटख्याच्या खुलेआम विक्रीप्रमाणे खुलेआम चर्चा जनतेत सुरू आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी नेरळ पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावाजवळ धाड टाकून गुटख्याचा किमान दहा लाख रुपयांचा साठा जप्त केला होता. हा जप्त करण्यात आलेला गुटखा पोलिसांनी गेल्या आठवड्यात जमिनीत गाडून नष्ट केला. त्यासाठी दुमजली घराएवढे दोन खड्डे खोदून त्यात गुटख्याची पाकिटे टाकून खड्डे भरले होते. हे उदाहरण ताजे असतानादेखील गुटख्याची सुरू असलेली खुलेआम विक्री आश्चर्यकारक मानली जात आहे.

गुटखा बंदीनंतर त्याची विक्री होत असेल तर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन यांना आहेत. त्यांनी धाड टाकण्यासाठी आमच्याकडे बंदोबस्त मागितला तर आम्ही तात्काळ देत असतो. त्यांच्या विभागाला अधिकार असल्याने आम्हाला काहीही करता येत नाही. पण कोणी तक्रार केल्यास आम्ही त्या विभागाला कळवून धाड टाकायला सांगू शकतो.
-अविनाश पाटील, प्रभारी पोलीस अधिकारी, नेरळ

First Published on: February 26, 2020 2:33 AM
Exit mobile version