आयटीआय प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी

आयटीआय प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी

आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ ते २० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीमुळे पहिल्या फेरीमध्ये प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, १ लाख ४५ हजार ९६८ जागांसाठी २ लाख ९७ हजार ७९२ अर्ज आले आहेत. यातील ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली होती. मात्र निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अवघ्या २७ हजार ३२२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये २१ हजार ३४८ तर खासगी आयटीआयमध्ये ५ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच कमी असल्याने पुढील फेरीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायामार्फत विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून २० सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश खात्यात प्रवेश करुन अ‍ॅडमिशन अ‍ॅक्टिव्हिटी – ग्रिव्हेन्स रिड्रेसल/एडीट अ‍ॅप्लिकेशन फॉर्म येथे क्लिक करावे. कोणत्याही प्रकारे अडचण असल्यास नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था वा हेल्पलाईन वर संपर्क साधावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाकडून करण्यात आले आहे. प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

First Published on: September 16, 2020 8:01 PM
Exit mobile version