महिला दिनानिमित्त आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

महिला दिनानिमित्त आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना “आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार” देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण 8 मार्च रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे देशाला पहिल्या टेस्टट्युबची भेट देणाऱ्या स्त्री प्रसूतीतज्ज्ञ पद्मश्री डॉ. इंदिरा हिंदुजा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

समाजात आपल्या कार्यामुळे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, चूल आणि मूल सांभाळत कर्तबगारी दाखवणाऱ्या, आपल्या कार्याने इतर महिलांना प्रेरित करणाऱ्या महिलांचा आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी संपूर्ण राज्यातील महिलांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची घोषणा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई पोलीस प्रमुख संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

…म्हणून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1909 ला न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही वर्ष 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 ला साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने`जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.


हेही वाचाः Chanakya Today Exit Poll: पंजाबमध्ये मोठा फेरबदल; उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचेही निकाल धक्कादायक

First Published on: March 7, 2022 8:48 PM
Exit mobile version