अजितदादा ! आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो

अजितदादा ! आपण इतकी  वर्षे उगाच वेगळे राहिलो

अजितदादा, आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर व्यक्त केली. आम्ही चांगल्या आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आता चांगले काम करून दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवे होते, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली.

उगाचच इतकी वर्षे वेगळे राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवे होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. आता जे काही आम्ही एकत्र आलेलो आहोत, आता आम्ही जे काही चांगले करायचे आहे ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. एवढं एक वचन, एवढी एक शपथ जिजाऊ आणि शिवरायांच्या साक्षीने घेतो. गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे; पण हे माझे सरकार आहे, आपले सरकार आहे ही भावना गोरगरिबांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवनेरीसाठी २३ कोटी मंजूर
शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज 23 कोटी मंजूर केले. चार विभागांना विभागून 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला 23 कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

First Published on: February 20, 2020 5:52 AM
Exit mobile version