पालेगावात डॉ. श्रीकांत शिंदे यांना घेराव; नागरी समस्येमुळे नागरिक झाले संतप्त

पालेगावात डॉ. श्रीकांत शिंदे यांना घेराव; नागरी समस्येमुळे नागरिक झाले संतप्त

पालेगावात डॉ. श्रीकांत शिंदे यांना घेराव; नागरी समस्येमुळे नागरिक झाले संतप्त
कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे प्रचारासाठी अंबरनाथ मधील पालेगाव येथे आले असता नागरिकांनी त्यांना पाणीप्रश्न आणि इतर नागरी समस्येवर चांगलेच धारेवर धरले. या मुद्द्यांवर उत्तरे देतांना डॉ. शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची चांगलीच दमछाक झाली.

अंबरनाथ नगरपालिकेत पालेगाव या प्रभागात मंगळवारी कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक शिवाजी गायकवाड आणि अन्य शिवसेना नेते, कार्यकर्ते पायी प्रचार करीत होते. यावेळी येथील नागरिकांनी अचानक डॉ. श्रीकांत शिंदे यांना घेराव टाकून प्रश्नांची सरबत्ती केली.

डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर तुम्ही ५ वर्षानंतरच दिसता एरव्ही तुम्ही कुठे असता? या ठिकाणी पाणी समस्या आहे. त्याचप्रमाणे कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत. भरमसाठ घरपट्टी वाढवली आहे. पाण्याची टाकी बांधणार असल्याचे केवळ आश्वासन देतात. मात्र, अद्यापही टाकी बांधलेली नाही, असे आरोप ओंकार म्हसकर या नागरिकांनी केले.

अंबरनाथ नगरपालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असून पालेगावमध्ये शिवनेचाच नगरसेवक आहे. त्यांना या नागरी समस्या सोडवण्यात अपयश आल्यामुळे आमदार आणि खासदार यांची चांगलीच गोची झाल्याची चर्चा शहरात आहे. तसेच हे सर्व नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले प्रश्न असून खासदार आणि आमदारांना विनाकारण घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे एका शिवसेना नेत्याने सांगितले आहे.

या ठिकाणी पाणी समस्या नाही केवळ उंच भागावर पाण्याची समस्या आहे. तेथे काही तबेले आणि वीट भट्ट्यांना पाणी मिळत नाही. आम्ही पाण्याची टाकी बांधण्याचे प्रयत्न करीत आहोत मात्र जागेसाठी मंजुरी मिळत नाही.  – डॉ. बालाजी किणीकर, आमदार

First Published on: April 25, 2019 10:05 PM
Exit mobile version