मटणावर ताव मारायला कैदी गेला घरी आणि…

मटणावर ताव मारायला कैदी गेला घरी आणि…

मटणावर ताव मारायला कैदी गेला घरी

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात नुकतीच म्हसोबाची जत्रा झाली. या जत्रेला एक कैदी पोलिसाच्या मदतीने बंदोबस्तात म्हसोबाला कापलेल्या बोकडाच्या मटणावर ताव मारण्यासाठी गेला होता. मंगळवेढाच्या सबजेलमध्ये खुनाच्या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता. तानाजी भोसले असे कैदीचे नाव असून तो गुपचूप पोलिसाच्या मदतीने बंदोबस्तात मटण खाण्यासाठी घरी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला आहे. त्यानंतर या कैदीमुळे तुरुंगातील २८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आणि सर्व प्रकार उघडकीस आला .

नेमके काय घडले?

पोलीस हवालदार माने यांनी मंगळवेढा सबजेलमधील कैदी तानाजी भोसले यांच्या पोटात दुखत असल्याने त्याला उपचारासाठी घेऊन गेल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, या कैदी उपचारासाठी न जाता स्वत:च्या घरी गेला आणि पोलीस बंदोबस्तात बोकडाच्या मटणावर ताव मारला. परंतु, याची कोणालाच खबर लागली नाही. पण, पुढे जे घडले त्य़ामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, कोरोनाने मंगळवेढ्यातील सब जेलमध्ये शिरकाव केला. या जेलमधील तब्बल २८ कैद्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये तानाजी भोसले या कैद्याचा देखील समावेश असल्याचे समोर येताच आंबे या गावातील नातेवाईकांची घाबरगुंडी उडाली. त्याचवेळी तानाजी भोसले याच्या तुरुंगातून घरी जाण्याच्या पराक्रम समोर आला.

आंबे गावात हजर असलेल्या सर्व नातेवाईकांची मात्र, आता बोबडी वळली आहे. तानाजीमुळे आपल्यालाही कोरोनाची बाधा होईल. या भीतीने त्यांची तारांबळ उडाली आहे. त्या जेवणाला जवळपास १०० पेक्षा जास्त नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. ही सर्व मंडळी कैदी तानाजी भोसले यांच्या संपर्कात आली होती.

कैदी घरी गेलाच कसा?

जेलमधील कैदी बोकडाचे मटण खाण्यासाठी त्याच्या घरी गेलाच कसा? याचा शोध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरु केला. मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्याकडे या प्रकरणाची माहिती घेतली असता सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असून आज संध्याकाळपर्यंत याचा अहवाल येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – Work From Home : गरोदर महिलांसह आजारी व्यक्तीला मिळणार ‘ही’ सुविधा


First Published on: July 23, 2020 7:51 PM
Exit mobile version