पंढरपूर देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे!

पंढरपूर देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे भूमिपूजन होत नाहीये. हे केवळ मार्गाचे भूमिपूजन नाहीये. तर पंढरपूरकडे जाणार्‍या या मार्गामुळे भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असे सांगताना भक्ती आणि शक्तीचे प्रतिक असलेले पंढरपूर भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पंढरपूर पालखी मार्गाचे चौपादरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. कार्याक्रमात नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. तर पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात दाखल झाले होते. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार खासदार उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, या मार्गाचे चौपदरीकरण होत आहे. पण त्यासाठी मला तुमच्याकडून तीन महत्त्वाच्या गोष्टी हव्या आहेत. एक म्हणजे या मार्गाभोवती छाया देणारी रोपे लावा. म्हणजे या रोपांचे वृक्षात रुपांतर झाल्यावर या संपूर्ण महामार्गावर सावलीचे आच्छादन निर्माण होईल. त्याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा प्याऊ बांधा. वारीला येणार्‍या प्रत्येक वारकर्‍यांना आणि प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंढरपूरमध्ये स्वच्छता राखली गेलीच पाहिजे. जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ तीर्थक्षेत्र कोणते? असा सवाल कुणी केल्यास पंढरपूर हेच नाव समोर आले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी राम कृष्णहरी, राम कृष्णहरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्याने सांगितले आहे पंढरपूरला आनंदाचेही प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकर्‍यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असे मोदी यांनी सांगितले.

दिंडीत जातपात नसते. भेदाभेद नसतो. सर्व वारकरी गुरुभाऊ आहे. वारकर्‍यांची एकच जात आहे. एकच गोत्र आहे. ते म्हणजे विठ्ठल गोत्र आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते. पंढरपूरची अभा, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

आपण म्हणतो ना, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिवरी. माझे पहिले नाते गुजरातच्या द्वारकाशी आहे. माझे दुसरे नाते काशीशी आहे. मी काशीचा रहिवासी आहे. आणि आपल्यासाठी पंढरपूर ही दुसरी काशी आहे. या भूमीत आजही देवाचा वास आहे. सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात असल्याचे संत नामदेवांनीही सांगितले आहे. या भूमीने अनेक संत दिले. युग संत निर्माण केले. या भूमीने भारताला नवे चैतन्य दिलं, ऊर्जा दिली, असेही त्यांनी सांगितले. भारतात नेहमीच अशा विभूती जन्माला आल्या. त्यांनी देशाला आणि जगालाही मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र सरकार सोबत राहील –मुख्यमंत्री
पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वारकर्‍यांचं कौतुक केले आहे. पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला ते म्हणाले की, नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतला आहात, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. साहजिकच आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेली अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस, रस्त्यातील काटे खळगे यांचा विचार न करता आपली परंपरा जोपासणारे आपले वारकरी, त्याच्यातले अनेक साधूसंत यांच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी कोणत्याही पावलावर राहून देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत राहू, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिले.

मी स्वत:ला भाग्यवान समजतो – गडकरी
या कार्यक्रमात नितिन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात संतांचे खूप मोठे योगदान आहे. या संतांसाठी पंढरपूर हे विशेष प्रेरणेचे स्थान आहे. पंढरपुरात चार वेळा यात्रा होतात. आषाढीच्या यात्रेत लाखो लोक येतात. अनेक वारकरी पायी या यात्रेत सहभागी होतात. या वारकर्‍यांसाठी पालखी मार्ग निर्माण करण्याची संधी मला मिळाली मी खूप भाग्यवान आहे. देशात तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक श्रद्धेने जातात. त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड चांगले पाहिजेत, असे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक वारसा मजबूत करण्यासाठी काम हाती घेतले आहे, असे नितिन गडकरी म्हणाले.

First Published on: November 9, 2021 5:15 AM
Exit mobile version