आषाढीवारीसाठी पंढरपूर सज्ज, राधाकृष्ण विखे पाटलांकडून मंदिराची पाहणी

आषाढीवारीसाठी पंढरपूर सज्ज, राधाकृष्ण विखे पाटलांकडून मंदिराची पाहणी

आषाढीवारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर सज्ज असल्याचे सूतोवाच राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पंढरपूर मंदिर आणि शहराच्या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, शहर व परिसरात वारकरी आणि भाविकांना देण्यात सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मंदिर व परिसर, महाद्वार चौक, नदीपात्र, पत्रा शेड, 65 एकर परिसराची पाहणी करून आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार रणजीतसिंह नाईंक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी आदिंसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंदिर परिसरातील अतिक्रमणं तात्काळ काढावीत

आषाढी वारीमध्ये प्रथा परंपरेप्रमाणे पादुका स्नानाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने महाद्वार घाटावरून नदीपात्रात या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पोलीस प्रशासनाने घाटावरील गर्दीचे योग्य नियोजन करावे. तसेच महाद्वार घाटावरील अडथळादायी वायर्सच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घ्यावी. मंदिर परिसरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत, जेणेकरून भाविकांना अडथळा येणार नाही, असे ते म्हणाले.

चंद्रभागा नदी पात्रातील खड्डे बुजवावेत

चंद्रभागा नदीपात्रातील पाणी स्वच्छ रहावे, यासाठी आषाढी एकादशीपूर्वी ७ दिवस पाणी सोडण्याच्या सूचना संबंधितांना करून श्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, चंद्रभागा नदी पात्रातील खड्डे बुजवावेत. नदी पात्रात धोक्याच्या ठिकाणी बॅरिगेट्स तसेच धोक्याच्या ठिकाणाची माहिती देणारे फलक लावावेत. नदीपात्र वेळोवेळी स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.

मंदिराभोवती पत्र्याचा निवारा शेड करण्याच्या, आवश्यकतेनुसार पंखे लावण्याच्या सूचना करून पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले दर्शन रांग अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने गरजेनुरूप खाजगी जागेवर मांडव उभा करून भाविकांची व्यवस्था करावी व त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात. दर्शन रांगेत गर्दी न करता मोकळे वातावरण राहील याबाबतची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

प्रथमच विशेष महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शनस्थळावर नेण्यासाठी विशेष वाहन

वारीवेळी विशेष महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून मंदीर परिसरात गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन व नियोजन करता येईल. विशेष महत्त्वाच्या व्यक्तींना विशेष वाहनाने दर्शनस्थळी पोहचविण्याचा विचार आम्ही करीत असल्याचे श्री विखे पाटील यांनी सांगितले.

विजेच्या पर्यायी व्यवस्थेसाठी …

वारी कालावधीत भाविकांना सुलभ दर्शन घडावे, यासाठी मंदिर समितीने आवश्यक नियोजन करावे. दर्शन रांग व दर्शन मंडपात स्वच्छता राखावी. तसेच मॅटची व्यवस्था करावी. विजेच्या पर्यायी व्यवस्थेसाठी जनरेटरची तजवीज करावी, दूध टँकरच्या माध्यमातून थंड आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे सांगून श्री, विखे पाटील यांनी गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पत्राशेडच्या ठिकाणी मोकळ्या जागेत मंडप उभा करावा, यामुळे वारकरी/भाविकांबरोबरच अधिकारी, कर्मचारी, भोजन व्यवस्था देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सावली मिळेल, शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच त्याठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.

नव्या पालख्यांना ओळखपत्र

यंदा प्रथमच मानाच्या पालख्या समवेत नव्याने येणाऱ्या दिंड्याना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे सांगून श्री. विखे पाटील म्हणाले, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड होऊ शकते, त्यामुळे मानाच्या पालख्यांची संस्थांकडे दिंड्यानी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आपण पुणे सातारामार्गे सोलापूर अशा संपूर्ण पालखी मार्ग व तळाची पाहणी केली असून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, पुणे आणि सातारा अशा तिन्ही जिल्ह्यातील पालखी मार्गावर चांगल्या व्यवस्थेचे नियोजन केले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.


हेही वाचा : Rajan Salvi : राजन साळवींच्या अडचणीत वाढ, ACBकडून कुटुंबाची दिवसभर चौकशी


 

First Published on: June 9, 2023 7:23 PM
Exit mobile version