पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना ‘धस’का दम!

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना ‘धस’का दम!

ठाकरे सरकारला ओबीसीची बाजू मांडायचीच नव्हती - पंकजा मुंडे

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांना जोरदार ‘झटका’ दिला आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा ७४ मतांनी पराभव केला आहे. अशोक जगदाळे यांचा पराभव हा बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंसाठी ‘धक्का’ आहे. निवडणुकीत १००६ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणींसाठी प्रतिष्ठेची होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी २८ मे रोजी निवडणूक होऊन नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती, कोकण आणि भंडारा-गडचिरोली येथील निकाल ३१ मे रोजी निकाल लागले होते. मात्र अपात्र मतदारांच्या घोळामुळे उस्मानाबाद-लातूर-बीडचा निकाल लागू शकलेला नव्हता. राज्याच्या राजकारणातील हाय व्होल्टेज समजला जाणाऱ्या या मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत सुरेश धस यांनी बाजी मारली आहे.

राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

या मतदारसंघात सुरुवातीलपासूनच अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीने भाजपमधून आयात केलेले उमेदवार रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढवली होती. त्यानंतर ऐनवेळी योग्य उमेदवार न मिळाल्याने नाईलाजाने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळेंना पाठिंबा द्यावा लागला होता. रमेश कराड यांनी चारच दिवसांत राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेवर आर्थिक गैरव्यवहारचे आरोप केले.  रमेश कराड हे स्वर्गीय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जात. कराड यांनी अर्ज मागे घेणे ही पंकजा मुंडेंची राजकीय चाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत पंकजा मुंडे यांनी बाजी मारली आहे.

मी विजयी होणारच – सुरेश धस

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सुरेश धस यांना विजय मिळवू असा विश्वास होता. ‘मी विजयी होणारच’, असा ठाम विश्वास सुरेश धस सुरूवातीपासून व्यक्त करत होते. एकूण मतांचे गणित पाहता भाजपकडे १०० मतांची कमतरता होती. त्यामुळे भाजप १०० मतांचे गणित कसे जुळवणार? हा प्रश्न होता. पण, विरोधकांची मते फोडत सुरेश धस यांनी विजय मिळवला. निवडणुकीत राष्ट्रवादीने पैसे वाटल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे.

सुरेश धस राष्ट्रवादीतून ६ वर्षासाठी निलंबित

पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली सुरेश धस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. आघाडी सरकारच्या काळात सुरेश धस यांच्याकडे महसूल राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. बीडमधील धनंजय मुंडे यांचे वाढते राजकीय वर्चस्व रोखण्यासाठी सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपला मदत केली होती. याशिवाय भाजपशी वाढती जवळीक पाहता सुरेश धस यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

First Published on: June 12, 2018 8:45 AM
Exit mobile version