‘हे खपवून घेणार नाही’, त्या व्हायरल व्हिडिओनंतर पंकजा मुंडे संतापल्या

‘हे खपवून घेणार नाही’, त्या व्हायरल व्हिडिओनंतर पंकजा मुंडे संतापल्या

माजी मंत्री पंकजा मुंडे

बीडमधील मुंडे बहिण-भावामधील संघर्ष बीड जिल्ह्याला नवा नाही. दोन्ही नेत्यांमधील संघर्षामुळे कार्यकर्ते देखील आपापसात भिडताना अनेकदा पाहिले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पुन्हा एकदा दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. पाटोद्यातील रोहतवाडी गावचे सरपंच आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या पांडुरंग नागरगोजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.

नागरगोजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात शांतता आणि खुख कामय राहावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही. माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय दिसतंय पालकांचं, हे खपवून घेतलं जाणार नाही.” अशा इशाराच धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा मुंडे यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खात्याची आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

“सत्ता नसली तरी पुण्याई आहे आणि हिंमतही आहे… सामाजिक न्याय करा, अन्याय चालत नाही इथे!!!”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. २०१४ ते २०१९ या काळात पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री होत्या. त्याकाळातही भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा खटके उडाले होते. त्यावेळी हाच आरोप धनंजय मुंडे हे पालकमंत्र्यावर करत असत.

पंकजा मुंडे यांचे समर्थक पांडुरंग नागरगोजे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोस्ट टाकली होती. ही पोस्ट चुकीची असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागरगोजे यांना मारहाण केली. तसेच हा व्हिडिओ देखील व्हायरल केला. त्यानंतर बीड जिल्ह्यात दोन्ही पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

First Published on: January 23, 2020 8:57 AM
Exit mobile version