माझ्या बापाला काही झालं असेल तर! अखेर पंकजा मुंडे बोलल्या

माझ्या बापाला काही झालं असेल तर! अखेर पंकजा मुंडे बोलल्या

“माझ्या बापाला काही झालं असेल तर तर त्या माणसाचा मी जीव घेईन. मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही हा विषय तुमचा नाही. आणि जर चौकशीची सुरुवात करायची असेल तर तुमच्यापासून करावी लागेल.” अशी घणाघाती टीका महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. केज तालुक्यातील अनेक विकासकामांच्या उदघाटनासाठी नांदूर येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्ह्यातील राजकारणावर आक्रमक होत त्यांनी विरोधकांवर आसूड ओढले.

“मुंडे साहेबांची हत्या झाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माझा राजीनामा मागत आहेत. जयंत पाटील यांना हे बोलायला शोभले पाहीजे. तुम्हाला चार वर्षांनंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसत आहे. पंकजा मुंडेचा राजीनामा मागता, एवढी कसली पकंजा मुंडेची भीती वाटते. पंकजाने जर एक आवाज दिला तर माझे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिल्लीपर्यंत रान उठवतील.”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

हे वाचा – कॉपी करुन वारसा येत नाही; तो रक्तात असावा लागतो – पकंजा मुंडे

आपल्या भाषणात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “लोकांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये. मुंडे साहेबांची भाषणे करुन मला मत मिळवायचे नाही. विरोधकांचे बोलवते ‘धनी’ कोण आहेत? हे सर्वांना माहीत आहे. आज तुमच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळेच तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या नावाचे राजकारण करत आहात”, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली.

हुजरेगिरी करणारा मुंडेचा वारसा होऊ शकत नाही

कुणासमोर झुकणे, हुजरेगिरी करणे हा गुण गोपीनाथ मुंडे यांच्यात नव्हता. जो हुजरेगिरी करत असेल तो गोपीनाथ मुंडे यांचा वारसा कधीच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तर मी त्यांचा आदर करते, पण त्यांना कमरेपासून वाकून कधी नमस्कार करत नाही. माझ्या रक्तात ते नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील मला कधी झुकायला लावले नाही.

First Published on: February 4, 2019 6:08 PM
Exit mobile version