राजकीय पेचात सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन, कोणत्या विषयावर संवाद?

राजकीय पेचात सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन, कोणत्या विषयावर संवाद?

चिंचवड – केंद्रीय निवडणूक आयागोने शिवसेनेचे पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांना आता शुन्यापासून पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. यावरून, राजकीय वर्तुळातून अनेक आडाखे बांधले जात असतानाच भाजपा नेत्या पकंजा मुंडे यांनीही उद्धव ठाकरेंना या सर्व पार्श्वभूमीवर फोन केला होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. चिंचवड येथे पोटनिवडणूक प्रचाराला आल्या असताना माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी उद्धव ठाकरेंशी बोलले आहे. पण काय बोलले हे माध्यमांना सांगणार नाही. एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. सत्तेत असल्याने आपल्यासोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे नाव नसताना पुन्हा आपला पक्ष उभा करणं ठाकरे यांच्यासमोरचा प्रश्न आहे. पुढे काय घडतं याचं कुतूहल आपल्याला आहे.’

हेही वाचा – लाल किल्ल्यावर दरवर्षी घुमणार शिवजयंतीचा गजर; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपासोबत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांना अनेक कार्यक्रमात डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने होत असतात. तसंच, त्यांना शिवसेनेत (ठाकरे गट) येण्याची खुली ऑफरही देण्यात आली होती. त्यामुळे भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे ठाकरे गटात जातील की नाही यावर राजकीय वर्तुळात कयास लावला जात आहे. त्यातच, उद्धव ठाकरेंवर पक्षाच्या नाव आणि चिन्ह गमावल्यामुळे ओढावलेल्या नामुष्कीनंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याने त्यांच्यात कशासंदर्भात संवाद झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, कसबा आणि पिंपरी येथील पोटनिवणूड दिवसेंदिवस रंगत होत जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत असल्याने दोन्हींकडून स्टार प्रचारक वादळी प्रचार करत आहेत. महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील यांनी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुण्याकडे लक्ष दिले आहे. तर, महायुतीकडून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही झंझावाती प्रचार केले आहेत. त्यामुळे २ मार्चला येणाऱ्या निकालात कोणाच्या पारड्यात अधिक मते पडली आहेत, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा घोडबंदर किल्ल्याच्या बुरूजावर सर्वात उंच भगवा ध्वज,उंची आहे….

First Published on: February 20, 2023 8:14 AM
Exit mobile version