नगरमध्ये शालेय कुस्ती स्पर्धेत ३८६ मल्लांचा सहभाग

नगरमध्ये शालेय कुस्ती स्पर्धेत ३८६ मल्लांचा सहभाग

नगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नगर तालुका क्रीडा समितीच्यावतीने निमगाव वाघा (तालुका नगर) येथे घेण्यात आलेल्या नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन रंगतादार कुस्त्यांच्या सामन्यांनी झाले. नगर तालुक्यातील ३६ शाळांमधील ३८६ मल्लांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पहिल्याच दिवशी कुस्तीचा थरार रंगला होता. या रंगतदार सामन्यात युवा मल्लांनी विविध डावपेचांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

मैदानाचे पूजन करुन नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्या हस्ते मल्लांची कुस्ती लावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी रघुनाथ झिने, क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे, प्रभारी मुख्याध्यापक किसन वाबळे, भागचंद जाधव, काशीनाथ पळसकर, धनंजय खर्से, नेप्तीचे सरपंच सुधाकर कदम, कादर शेख, भानुदास ठोकळ, पोपट शिंदे, उद्योजक दिलावर शेख, संदीप डोंगरे, गुलाब केदार, जालिंदर आतकर यांच्यासह कुस्तीपटू, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुस्तीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा समिती प्रयत्न

निर्व्यसनी व निरोगी युवा पिढीच्या निर्माणासाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगर तालुका क्रीडा समिती कार्यरत आहे. कुस्तीमध्ये शालेय मुला-मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा समिती प्रयत्न करीत असल्याचे नाना डोंगरे यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसीय स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचे सामने

निमगाव वाघा येथील मिलन मंगल कार्यालयात दिवसभर मुलांच्या कुस्त्यांचे सामने रंगले होते. सदर कुस्त्या मॅटवर खेळविण्यात आल्या असून, या दोन दिवसीय स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचे सामने देखील रंगणार आहेत. पंच म्हणून राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, गौरव पाटील, समीर पटेल, रमाकांत दरेकर, मल्हारी कांडेकर, गणेश जाधव यांनी काम पाहिले.

First Published on: September 19, 2019 3:48 PM
Exit mobile version