पळून जाणाऱ्यांवर कारवाई करणार – अनिल देशमुख

पळून जाणाऱ्यांवर कारवाई करणार – अनिल देशमुख

गृहमंत्री देशमुखांचे पोलिसांना आदेश

राज्यात सध्या करोनाचे संकट असून, आतापर्यंत ४९ रुग्ण करोना बाधित झाले आहेत. यामध्ये एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले. त्यामुळेच राज्य सरकार सतर्क झाले असून, सरकारकडून देखील योग्य उपायोजना आखल्या जात आहेत. मात्र क्वॉरंटाईन केलेले असताना देखील काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता राज्याचा गृहविभाग देखील सतर्क झाला असून, क्वॉरंटाईन केलेले असतानाही तिथून पळ काढणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे अशा लोकांच्या माध्यमातून करोना व्हायरसचा फैलाव होण्याची शक्यता कमी होणार आहे. शिवाय, सध्या महाराष्ट्र करोनाच्या फैलावाच्या दुसऱ्या टप्प्यावर असून अधिक वाढ न होता याच टप्प्यावरून फैलाव कमी होण्यासाठी देखील मदत होऊ शकणार आहे.

साथीचे रोग अधिनियम अन्वये कारवाई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी होऊ नये, यासाठी परदेश प्रवासाचा इतिहास असणाऱ्यांना क्वॉरंटाईन केले जात आहे. मात्र, असे असून देखील हातावर क्वॉरंटाईन शिक्का असलेले काही जण सार्वजनिक वाहनातून तसेच शहरांमध्ये फिरताना आढळले होते. यामुळे इतर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गृहविभागाने अशा लोकांवर साथीचे रोग अधिनियम अन्वये कारवाई करण्याचा आदेश दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

क्वॉरंटाईन स्टॅम्पसोबत करत होते प्रवास

बुधवारी पालघर रेल्वे स्थानकावर चार संशयित करोना रुग्णांना उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हे चौघेही जर्मनीतून आले होते. मुंबई विमानतळावर उतरून ते गरीब रथ या ट्रेनने मुंबई ते सूरत असा प्रवास करत होते. मात्र, यावेळी काही प्रवाशांनी त्यांच्या हातावर करोना रुग्णांसंदर्भातला क्वॉरंटाईन स्टॅम्प पाहिला. हे कळताच प्रवाशांनी याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर ट्रेन पालघर स्थानकावर थांबवून चौघांनाही गाडीमधून उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या चारही जणांची मुंबई विमानतळावर आल्यावर करोना विषाणूची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी चौघांनाही करोनाची बाधा झालेली नव्हती. तरीही त्यांना १४ दिवस होम क्वॉरंटाइनमध्ये राहण्यास सांगितले होते.


हेही वाचा – करोना : मुंबईत २ रुग्ण व्हेटिंलेटरवर!
First Published on: March 19, 2020 6:03 PM
Exit mobile version