Raigad Phansad Sanctuary : फणसाडमधील पक्ष्यांची पर्यटकांना साद

Raigad Phansad Sanctuary : फणसाडमधील पक्ष्यांची पर्यटकांना साद

फणसाड अभयारण्यात पक्ष्यांच्या प्रजातीत वाढ झाली आहे

उदय खोत : आपलं महानगर वृत्तसेवा

नांदगाव : मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य आता खर्‍या अर्थाने ‘बोलू’ लागले आहे. काही दिवसांपासून फडसाड अभयारण्यात विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. विपुल जैवविविधता आणि वनसंपदा अशी नैसर्गिक श्रीमंती लाभलेले फणसाड अभयारण्य पक्षीप्रेमींना साद घालत आहे. त्यामुळे स्वाभाविकच या पक्ष्यांना न्याहाळण्याची आणि त्यांना जवळून पाहण्याची पर्वणी वन्यजीव-पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना लाभली आहे.

फणसाड अभयारण्य तब्बल 52 चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरले आहे. मुरुडपासून केवळ 10 किलोमीटर आणि मुंबईपासून अवघ्या 150 किलोमीटरवर असलेले अभयारण्यात पाऊल टाकले की पर्यटक तहानभूक हरवून जातो. या अभयारण्यात अलीकडेच केलेल्या पाहणीनुसार विविध प्रकारच्या सुमारे 190 विविध रंगीबेरंगी, बहुढंगी पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या आहेत. यापूर्वी पक्ष्यांच्या 164 प्रजाती आढळून येत होत्या. आता त्यात तब्बल 26 प्रजातींची वाढ झाल्याचे अलीकडच्या पक्षीगणनेत आढळले आहे.

हेही वाचा… Raigad Gairan land News : 99 हेक्टर गायरान जमिनींवर खासगी कब्जे

पक्षी निरीक्षकांची निवड

फणसाडमध्ये दरवर्षी महाराष्ट्र वन विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पक्षी निरीक्षण, तसेच गणनेचे आयोजन करण्यात येते. यात काही पक्ष्यांची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. लाईन ट्रान्सेक्ट आणि पॉइंट काऊंट या शास्त्रीय पद्धतीने ही गणना करण्यात आली. या पक्षगणनेसाठी देशभरातील वनप्रेमी सहभागी होतात. त्यातून 40-45 जणांची निवड करून त्यांचे 11 गटांत विभाजन करण्यात येते. जवळपास 17 लाईन ट्रान्सेक्ट आणि एक पॉइंट काऊंटचा वापर करून तीन दिवसांत पक्ष्यांची नोंद करण्यात येते.

हेही वाचा… Raigad RTE admission : आरटीई प्रवेशावर पालकांचा सवाल

गेल्या वेळी केलेल्या पक्षी गणनेत माशीमार, खाटीक, बेडुकमुखी, कोतवाल, कोकीळ, टिकेलचा कस्तुर, विविध प्रजातीची घुबडे, निळ्या चष्म्याचा मुंगशा, मलबारी कवड्या, धनेश, रंगीत तुतारी, कालवफोड्या, तीर चिमणी, कस्तुर आदी पक्ष्यांचा समावेश होता. याखेरीज 50 प्रजातींची बहुरंगी फुलपाखरे, आठ प्रजातीचे सरपटणारे प्राणी, दहा जातींचे उभयचर प्रजातींचे कोळी, 23 प्रकारचे सस्तन प्राणीही आढळून आले आहेत.

अशी होती पक्षी गणना

पक्ष्यांची गणना करण्यासाठी प्रत्येक गटासोबत एक पक्षीतज्ज्ञ, एक ग्रीन वर्क्सचा स्वयंसेवक आणि एका वनरक्षकाचा समावेश असतो. गणना करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या नोंदणीची पडताळणी तज्ज्ञांकडून केल्यानंतरच त्यास संमती देण्यात येते. – राजवर्धन भोसले, वन परिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य

(Edited by Avinash Chandane)

First Published on: April 24, 2024 4:42 PM
Exit mobile version