घरमहाराष्ट्रकोकणRaigad RTE admission : आरटीई प्रवेशावर पालकांचा सवाल

Raigad RTE admission : आरटीई प्रवेशावर पालकांचा सवाल

Subscribe

आरटीई अंतर्गत प्रवेश देताना सरकारी शाळांना प्राधान्य का देता? असा सवाल विचारत रायगड जिल्ह्यांतील पालकांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जागा २१ हजार ६०४ असताना केवळ २०७ अर्ज आले आहेत.

अलिबाग : आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीईसाठी पहिले प्राधान्य सरकारी आणि अनुदानित शाळांना दिले जात आहे. त्यात प्रवेश मिळतोच, त्यासाठी आरटीईची गरज काय, असा पालकांचा सवाल आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आरटीई अंतर्गत हजारो जागा असूनही केवळ २०७ अर्ज आल्याची माहिती मिळते.

रायगड जिल्ह्यात २ हजार ९१० शाळा आहेत. त्यामध्ये आरटीईनुसार २१ हजार ६०४ जागा आरक्षित ठेवल्या आहेत. शुक्रवारपर्यंत फक्त २०७ अर्ज दाखल झाले होते. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. त्यामुळे किती पालक प्रवेशास पसंती देतात, याबाबतचे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मंगळवारपासून (१६ एप्रिल) अर्ज भरण्यास सुरवात झाली असून ३० एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad School News : रोहे, महाडमध्ये चिमुरड्यांचा शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सव’

समाजातील आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, अंतर्गत प्रवेश प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. बुधवारपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Roha Play Ground : मैदान नगरपरिषदेचे, मक्तेदारी राजकीय मंडळी, मंडळांची

पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरत असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादी समोर येत आहे. त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे. सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा मग आरटीईचा अर्ज कशाला करायचा? अर्ज न भरतासुद्धा शाळेत थेट प्रवेश मिळतोच ना? मग एवढा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आपल्या मुलालाही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पालक आरटीईतून प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होते.

प्रवेश प्रक्रियेत बदल

आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदापासून काही बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरपर्यंत अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांची निवड करतांना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

अशी करा नोंदणी

आरटीई अंतर्गत पाल्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठीचे नियम, आवश्यक कागदपत्रे आदींबाबत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -