फोन टॅपिंगची माहिती भाजपच्या नेत्यानेच दिली; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

फोन टॅपिंगची माहिती भाजपच्या नेत्यानेच दिली; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग आणि स्नुपिंग झाल्याप्रकरणाची आता महाविकास आघाडीने चौकशी सुरु केली आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे होत आहेत. यादरम्यान संजय राऊत यांच्या ट्विटने खळबळ माजवली आहे. ‘आपके फोन टॅप हो रहे है’, अशी माहिती मला भाजपच्याच वरिष्ठ मंत्र्याने दिली असल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

आपले फोन टॅप हो रहे है, अशी माहिती मला मागेच भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती. “मी त्यावेळी म्हणालो होतो की, मी बाळासाहेबांचा शिष्य आहे. मला जे बोलायचे किंवा करायचे आहे ते मी लपून-छपून नाही करत. माझी बातचीत जर कुणाला ऐकायची असेल तर ऐकू द्या.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर फोन टॅपिंगचा आरोप करत ठाकरे सरकारने फोन टॅपिंग आणि स्नुपिंगची चौकशी करावी अशी मागणी केली होती. तसेच महाराष्ट्र सरकारचे कोणते अधिकारी इस्रायलला जाऊन पेगॅसस नावाचे मालवेअर घेऊन आले होते त्यांची चौकशी करावी, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर काही आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नजर ठेवण्यासाठी इस्रायली कंपनीचे पेगॅसस नावाचे सॉफ्टवेअरची पडताळणी करण्यासाठी राज्यातील अधिकारी गेले होते. याची चौकशी आता होणार आहे. हे प्रकरण गंभीर असून जर या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आढळल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

First Published on: January 24, 2020 11:51 AM
Exit mobile version