पिंपरी-चिंचवडचे महापौरपद अडीच वर्षे महिलांसाठी आरक्षित!

पिंपरी-चिंचवडचे महापौरपद अडीच वर्षे महिलांसाठी आरक्षित!

पिंपरी महापालिकेच्या महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी (खुला) राखीव झालं आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने आज (बुधवारी) मुंबईत राज्यातील महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. त्यामुळे आता इथलं महापौरपद चिंचवडकडेच राहणार की भोसरीकडे जाणार? कोणाची महापौरपदी वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतील महापालिका महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाल १४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात आला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून महापौरांना दिलेली तीन महिन्यांची मुदतवाढ २१ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.

राहुल जाधव यांना पुन्हा संधी नाही!

दरम्यान, आता पुढील अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. त्यामध्ये पिंपरीचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी (खुला) राखीव झाले आहे. त्यामुळे आता महापौर कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. २१ नोव्हेंबर रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांची मुदतवाढ २० नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. मागास प्रवर्गातून राहुल जाधव महापौर झाले होते. मात्र, आता महिलांसाठी महापौरपद राखीव झाल्यामळे जाधव यांना पुढची संधी मिळणार नाही.


हेही वाचा – नाशिकसह मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर

अशा आहेत महापौरपदासाठीच्या सोडती…

• मुंबई – खुला प्रवर्ग
• पुणे – खुला प्रवर्ग
• नागपूर – खुला प्रवर्ग
• ठाणे – खुला प्रवर्ग
• नाशिक – खुला प्रवर्ग
• नवी मुंबई – खुला प्रवर्ग महिला
• पिंपरी चिंचवड – खुला प्रवर्ग महिला
• औरंगाबाद – खुला प्रवर्ग महिला
• कल्याण डोंबिवली – खुला प्रवर्ग
• वसई विरार – अनुसूचित जमाती
• मिरा भाईंदर – अनुसुचित जाती
• चंद्रपूर – खुला प्रवर्ग महिला
• अमरावती – बीसीसी
• पनवेल – खुला प्रवर्ग महिला
• नांदेड – बीसीसी महिला
• अकोला – खुला प्रवर्ग महिला
• भिवंडी – खुला प्रवर्ग महिला
• उल्हासनगर – खुला प्रवर्ग
• अहमदनगर – अनुसूचित जाती (महिला)
• परभणी – अनुसूचित जाती (महिला)
• लातूर – बीसीसी सर्वसाधारण
• सांगली – खुला प्रवर्ग
• सोलापूर – बीसीसी महिला
• कोल्हापूर – बीसीसी महिला
• धुळे – बीसीसी सर्वसाधारण
• मालेगाव – बीसीसी महिला
• जळगाव – खुला प्रवर्ग महिला

First Published on: November 13, 2019 5:29 PM
Exit mobile version