घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रNarendra Modi Rally in Pune : एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर, मोदींची...

Narendra Modi Rally in Pune : एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर, मोदींची घणाघाती टीका

Subscribe

ज्यांची स्वप्ने किंवा मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत, ते आत्मे भटकत राहतात. महाराष्ट्रही अशाच भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेतून इंडिया आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

पुणे : असे म्हणतात की ज्यांची स्वप्ने किंवा मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत, ते आत्मे भटकत राहतात. महाराष्ट्रही अशाच भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला आहे. 45 वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिर झाला. या नेत्यामुळे महाराष्ट्रातील विविध मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. आता संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ हा अतृप्त आत्मा करतोय, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यातील सभेत नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली. या सभेत त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर जोरदार हल्ला चढविला. तसेच धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला आपण कायम विरोध करू असेही सांगितले.

पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर, मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. पुण्यातील भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार, शिरुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमधील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे, मनसेचे नेते अमित ठाकरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024: बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकत नाहीत; तर…; मोदींनी स्पष्टच सांगितलं

गेल्या 10 वर्षात आम्ही देशातील महागाई रोखण्यावर भर दिला असून, भ्रष्टाचारही रोखला असल्याचे सांगत आपल्या सरकारने पुणेकरांसाठी काय केले, याचा पाढाच नरेंद्र मोदी यांनी वाचला. पुणेकरांसाठी आपल्या सरकारने मेट्रो आणली, पुणे एअरपोर्टवर नवा टर्मिनस आणला, पालखी मार्ग तयार केला, समृद्धी महामार्ग बांधला, वंदे भारत ट्रेन आणली, याची आठवण त्यांनी करून दिली.

- Advertisement -

इनोव्हेशन, टॅलेंट आणि टेक्नोलॉजीवर विश्वास…

यूपीए काळातील मनमोहन सिंग सरकारने पायाभूत सुविधांवर जेवढा खर्च 10 वर्षात केला, तेवढा आम्ही एका वर्षात करतो, असे सांगून मोदी म्हणाले की, आजचा भारत तरुण, त्यांचे इनोव्हेशन, टॅलेंट आणि टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवून पुढे जातो आहे. केवळ 10 वर्षात भारतातील युवकांनी सव्वा लाख स्टार्टअप सुरू केले आहेत. यातील बहुतांश स्टार्टअप पुण्यातच आहेत.

इनोव्हेशन करणाऱ्यांना अंतरिम बजेटमध्ये एक लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. भारताच्या इतिहासात सर्वाधिक पेटंट तरुण दाखल करत आहेत. 10 वर्षांपूर्वी भारत मोबाईल फोन आयात करत होता. आज 10 वर्षानंतर आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोबाईल फोन निर्यातदार झालो आहोत. मेड इन इंडिया चिप्स वापरणाऱ्या गाड्या चालताना आता तुम्ही बघाल. भारताला सेमी कंडक्टर हब यामध्ये मजबूत करण्याचा भाजपाचा संकल्प आहे.

धर्मावर आरक्षणाचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही

बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्यामुळेच गरीब घरातील एक मुलगा पंतप्रधान होऊ शकला. आरक्षण बाबासाहेबांमुळे मिळाले आहे. राज्यघटनेने ते दिले आहे. आता काँग्रेस हेच आरक्षण धर्माच्या नावाखाली देण्याचा नियोजन करते आहे, अशी टीकाही मोदींनी केली. पण जोपर्यंत मोदी सत्तेवर आहे, हे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : दानवे-खोतकर एका कार्यक्रमात, पण एकमेकांशी बोलले नाहीत; महायुतीतील नेत्यांमध्ये नाराजी कायम


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -