कचरा वेचणारी आई आणि वेठबिगारी करणारे वडील, पण मुलींची जिद्द कायम!

कचरा वेचणारी आई आणि वेठबिगारी करणारे वडील, पण मुलींची जिद्द कायम!

(फोटो प्रातिनिधिक आहे)

मुलींबद्दल भारतीय समाजाची मानसिकता जरी आता बदलू लागली असली, तरी अजूनही अनेक ठिकाणी मुलींबाबत, त्यांच्या शिक्षणाबाबत अनास्था कायम आहे. त्यातही जर एकीहून अधिक मुली असल्या, तर जास्तच! पण पिंपरी-चिंचवडमध्ये राहाणाऱ्या दाम्पत्याचं मात्र मत वेगळं आहे. राजेंद्र मगर आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांना एकूण ७ मुली आहेत. हा आकडा ऐकून आपल्याला जरी विशेष धक्का बसला असला, तरी त्यांच्यासाठी मात्र या सातही मुली सारख्याच आहेत. ते या सातही मुलींना तितक्याच प्रेमाने वाढवत आहेत. बरं मगर दाम्पत्याचा कोणताही पीढिजात धंदा, व्यवसाय, नोकरी किंवा मालमत्ता नाही कि जिच्या जोरावर ते या मुलींना बिनधास्तपणे वाढवत आहेत. मगर दाम्पत्य पुणे महानगरपालिकेसाठी कचरा वेचण्याचं काम करतात. त्यामुळे असंख्य आर्थिक अडचणी असूनही ते या सात मुलींचा सांभाळ करत आहेत. आणि त्यातल्याच निकिता आणि नेहा या दोघी जुळ्या बहिणींनी याच जिद्दीच्या जोरावर दहावीला घवघवीत यश मिळवलं आहे. यात नेहाला ७२.८० टक्के तर निकिताला ६१.६० टक्के मिळाले आहेत.

वेठबिगारी आणि कचरा वेचून मुलींचा सांभाळ

साध्या कचरावेचक पालकांच्या मुलींनी असं निर्भेळ यश मिळवल्यामुळे परिसरामध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मगर दाम्पत्य हे मूळचे उस्मानाबादचे आहे. पण गावात काहीच काम नसल्यामुळे मगर दाम्पत्य पिंपरी-चिंचवडमध्ये भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी दाखल झालं. पालिकेचं शहरातला कचरा वेचण्याचं काम त्यांना मिळालं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ७ मुलींच्या पोटाला आधार मिळाला. मनीषा कचरा वेचण्याचं काम करत असतानाच राजेंद्र मगर वेठबिगारी करून मुलींचं पोट भरू लागले. पण इतक्या समस्या असूनही मनीषा आणि राजेंद्र मगर यांनी हार न मानता सातही मुलींनी शिकवण्याचा निर्धार केला. तोच निर्धार त्यांच्या मुलींमध्येही उतरला असून परिस्थितीचा सामना करत या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.


हेही वाचा – निकालात इंग्रजी शाळांची सरशी,मराठी माध्यमाची पिछेहाट

आर्थिक अडचणींचा सामना

नेहा आणि निकिता या दोघी जणी सध्या उस्मानाबाद येथे चुलता आणि चुलतीकडे असतात. चुलतीला गंभीर आजार असून त्यावर आत्तापर्यंत खूप खर्च झालेला आहे. त्यामुळे उच्चशिक्षित होऊन नेहाला डॉक्टर व्हायचं आहे. तिला गरिबांसाठी काम करायचं असून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असा निर्धार नेहाने व्यक्त केला आहे. सात बहिणी आणि त्यांचं शिक्षण, यामुळे अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो असं देखील नेहाने सांगितलं आहे.

First Published on: June 12, 2019 6:30 PM
Exit mobile version