घरक्राइमRaigad Police Crime News : दानपेटी चोरांना रायगड पोलिसांच्या बेड्या

Raigad Police Crime News : दानपेटी चोरांना रायगड पोलिसांच्या बेड्या

Subscribe

खोपोलीतील बहिरी देव मंदिरात चोरी करणाऱ्या चौकडीला रायगड पोलिसांनी सावंतवाडीमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे ही आंतरराज्यीय टोळी असून एकजण बांगलादेशी आहे. या चौकडीने आतापर्यंत अनेक मंदिरांमधील दानपेट्यांमधील रक्कम चोरली आहे.

आपलं महानगर वृत्तसेवा

अलिबाग : खोपोली परिसरातील बहिरी देव मंदिर आणि हनुमान मंदिरातील दानपेट्यांमधील रक्कमेची गेल्या आठवड्यात चोरी झाली होती. याचा मागोवा घेताना रायगड पोलिसांनी पकडलेली चौकडी साधीसुधी नसून मंदिरांच्या दानपेटीची लूट करणारी ती आंतरराज्यीय टोळी असल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर यातील एकजण बांगलादेशी आहे. या टोळीने खोपोलीतील मंदिरांमधून 16 हजार रुपये चोरले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 7 लाख रुपये हस्तगत केल्यामुळे या टोळीने किती मंदिरांमधील तिजोर्‍या फोडल्या आहेत, याची माहिती रायगड पोलीस घेत आहेत. सावंतवाडी पोलिसांच्या सहकार्याने या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा… Raigad News : रायगडमधील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर अज्ञातांचा हल्ला; गाडीच्या फोडल्या काचा

- Advertisement -

खोपोलीतील बहिरी देव मंदिराची दानपेटी 25 एप्रिल रोजी आणि हनुमान मंदिरातील दानपेटी २६ एप्रिलच्या रात्री फोडण्यात आली. बहिरी देव मंदिरातील दानपेटीतून 10 हजार रुपये तर हनुमान मंदिरातून 8 हजार रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी रायगड पोलिसांनी राजू फरत शेख (मूळ बांगलादेशी, सध्या प. बंगाल), इम्रान शहीद शेख (सूरत, गुजरात), राकीव कुलमोहम्मद शेख (सूरत, गुजरात आता नालासोपारा) आणि मुजाहित गुलजार खान (मूळ झारखंड, आता रांजणगाव) यांना सावंतवाडीतील एका हॉटेलमधून अटक केली.

हेही वाचा… Raigad Matheran Tourism : माथेरानच्या पर्यटन उत्पन्नावर रेल्वेची नजर

- Advertisement -

खोपोलीतील दोन मंदिरात लागोपाठ चोर्‍या झाल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी कौशल्यपूर्वक तपास करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या. त्याचप्रमाणे खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी घटनास्थळी भेटी देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर खोपोलीच्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अभिजीत व्हरांबळे, पोलीस उपनिरीक्षक आणि पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. अगदी खोपोली ते पनवेलपर्यंत पाठलागही केला. पण ते निसटले आणि पुढे गोव्याला गेले.

सोमवारी (29 एप्रिल) तपास पथक पहाटे गोव्यात दाखल झाले. तेथून म्हापसा येथे आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी तेथील एका मंदिरामध्ये मोठ्या रक्कमेची चोरी झाल्याची माहिती मिळाली. ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याची रायगड पोलिसांची खात्री झाली. त्याचवेळी हे आरोपीत सावंतवाडीला पोहोचल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक तातडीने सावंतवाडीला पोहोचले. तिथे एक हॉटेलमधून पोलिसांनी मोठ्या शिताफीने चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून ७ लाख 2 हजार 800 रुपये हस्तगत केले. यावेळी आरोपी राजू फरत शेख याने त्याच्या वाट्याला आलेल्या रक्कमेपैकी 1 लाख 33 हजार रुपये त्याच्या नातेवाईकाच्या बांगलादेशातील बँक खात्यात वर्ग केल्याचेही तपासात उघड झाले.

खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, हवालदार सागर शेवते, पी.व्ही.पाटील, पी.व्ही. पाटील, पी.टी. कुंभार, व्ही.व्ही. जाधव, पी.एल. भालेराव, एल.जी. शेडगे, एस. पी. बांगर, आर. एस. मासाळ, पी. एम. कळमकर, कॉन्स्टेबल पी. एस. खरात, के. डी. देवकाते यांनी ही कामगिरी फत्ते केली.

’या’ मंदिरांमध्ये चोरी

या चारही आरोपींना मंगळवारी (30 एप्रिल) अटक झाली. त्यात त्यांनी बहिरी देव मंदिर (खोपोली), हनुमान मंदिर (शिळफाटा-खोपोली), पंचायतन मंदिर (खालापूर), जैन मंदिर (शिरूर-पुणे), श्री स्वामी समर्थ मंदिर (टिटवाळा) आणि गोव्यात म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केल्याचे कबुली पोलिसांकडे दिली. चौघांना शुक्रवारपर्यंत (3 मे) कोर्टाने पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -