खड्डे बुजविण्यासाठी पोलीस उतरले रस्त्यावर!

खड्डे बुजविण्यासाठी पोलीस उतरले रस्त्यावर!

खालापूर तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुर्दशा झाली असताना ठेकेदारांचा पत्ता नसला तरी वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस रत्यावरील खड्डे भरण्यासाठी घमेल, फावडे घेऊन रस्त्यावर उतरले. जीवघेणे अपघात टाळण्यासाठी रविवारी रात्री त्यांनी रस्त्यावरील खड्डे भरायला सुरुवात केली. खोपोली पेण राज्य मार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडणारा महत्वाचा खालापूर पेण बाह्यमार्गाची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे.

उताराचा रस्ता आणि रस्त्याला दोन फुटांपेक्षा जास्त खोल पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीसह मोठ्या वाहनांचा प्रवास धोकादायक झाला होता. दरवर्षी खड्ड्यांमुळे याठिकाणी अपघात होऊन जीव जातात. सध्या पडणार्‍या मुसळधार पावसाने खड्ड्यांचा आकार वाढत आहे. खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी संबधित बाब पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना सांगितली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो याची कल्पना दिली. त्यानंतर कोईंगडे यांनी वर्दळ कमी असताना रविवारी रात्री पोलीस कर्मचार्‍यां सोबत घेऊन खालापूर पेण बाह्यमार्ग गाठला. स्थानिकांना जमेल तशी मशनरी आणि खडीची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. पोलीस स्वतः अशा प्रकारे काम हाती घेत आहेत हे पाहून खालापूर तालुक्यातील मदतीसाठी सदैव आघाडीवर असलेला गुरूनाथ साठेलकर यांचा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप मदतीसाठी धावला. वडवळचे जितेंद्र सकपाळ, गुरूनाथ साठेलकर, जितेंद्र रावळ, अमोल कदम, हनिफ कर्जीकर, मितेश शहा पोलिसांच्या मदत कार्यासाठी पोहचले.

धोधो पावसात खड्डे बुजविताना केवळ खडीचा उपयोग होत नाही हे पाहून पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजविण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात काम झाले असले तरी मोठा अपघात टळणार आहे याचे समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर होते.

First Published on: September 17, 2019 1:04 AM
Exit mobile version