कपाळावर गंध लावलेल्या पोलिसास वरिष्ठांची ‘ताकीद‘

कपाळावर गंध लावलेल्या पोलिसास वरिष्ठांची ‘ताकीद‘

खाकी वर्दी हिच पोलिसांची जात असते आणि ‘कर्तव्य बजावणे’ हाच त्यांचा धर्म असतो. कर्तव्य बजावताना तो हिंदू, मुस्लिम वा अन्य कोणत्याही धर्माचा नसतो. त्यामुळे त्याने आपल्या कपाळावर गंध, टिळा वा तत्सम बाबी लावणे अपेक्षीतच नाही. किंबहुना कायद्याच्या चौकटीत अशा बाबींना कोणताही थारा नसतो. असे असतानाही शिवजयंती मिरवणुकीच्या वेळी एका पोलिस अधिकार्‍याने भगवा टिळा लावला म्हणून त्याच्या वरिष्ठाने त्याला सक्त ताकीद दिल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी नक्की कसे वागावे याची संहिता तयार असते. पोलिस भरती झाल्यावर या संहितेची कल्पना वरिष्ठांकडून संबंधितांना दिली जाते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशिक्षण शिबिरातही त्यांना याविषयीचे मार्गदर्शन केले जाते. कोणत्याही धर्माचा, संस्थेचा वा व्यक्तीचा प्रभाव असल्यास त्याचे प्रतिबिंब त्याच्या वर्तनात उमटू शकते. विशेषत: कर्तव्य बजावत असताना धर्म, संस्था वा व्यक्तीच्या अनुषंगाने त्याचे वर्तन ठरू शकते. शिवाय समोरच्या व्यक्तींच्याही मनात पोलिसांविषयी गैरसमज पसरु शकतात. म्हणूनच ठरवून दिलेल्या संहितेची काटेकोेरपणे अमलबजावणी करण्याचे पोलिसांवर बंधन आहे. पोलीस खात्यासारख्या शिस्तप्रिय खात्यात नोकरीस असताना खात्याच्या शिस्तीबाबत ज्ञान व जाणीव हवी. तरीही, कुणी कपाळावर गंध, टिळा वा तत्सम बाबी लावून कर्तव्यावर हजर झाला तर ही कृती नियमबाह्य समजली जाते. हे पोलीस खात्याच्या नावलौकिकास बाधा आणणारी व गंभीर स्वरुपाचे कृत्य ठरते. नाशिकमध्ये या नियमाचे उल्लंघन एका पोलीस अधिकार्‍याने केल्याने त्याला वरिष्ठांच्या शास्तीला सामोरे जावे लागले.

घडले असे की, पोलीस उपायुक्त अमोल तांबे शिवजयंतीनिमित्त बंदोबस्ताचे नियोजन करण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात आले होते. ते सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवजयंतीनिमित्त बंदोबस्ताच्या सूचना देत होते. त्यावेळी एक पोलीस अधिकारी कपाळावर गंध लावलेला दिसून आला. ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीस खात्याच्या नावलौकीकास बाधा आणणारी आहे. भविष्यात अशाप्रकारची कसूर होवू नये, यासाठी पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी ‘त्या’ अधिकार्‍यास पुन्हा असे न करण्याची ‘सक्त ताकीद’ दिली आहे.

First Published on: February 28, 2020 7:24 AM
Exit mobile version