आधी गणपती विसर्जन, मगच पोलिसांच्या बदल्या!

आधी गणपती विसर्जन, मगच पोलिसांच्या बदल्या!

राज्याच्या गृह खात्याकडून आयपीएस अधिकार्‍यामधील वादग्रस्त बदल्यांवर सही करण्यास पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी स्वाक्षरी करण्यास स्पष्ट नकार दिल्याने ठाकरे सरकारची मोठी कोंडी झाली आहे. राज्यातील पोलिसांच्या बदल्यांबाबत तिसर्‍यांदा वाढवण्यात आलेली पंधरा ऑगस्टची मुदतवाढ शुक्रवारी संपुष्टात आली त्यामुळे आघाडी सरकारने पोलिसांच्या बदल्यांना चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता पोलिसांच्या बदल्या पाच सप्टेंबरपर्यंत करता येणार आहेत. २२ ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव असल्याने पोलिसांच्या बदल्या आता गणपती विसर्जनानंतरच होतील. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यात बदल्यांवरून शीतयुद्ध सुरू आह

मर्जीतील अधिकार्‍यांना क्रीम पोस्टिंग देण्यासाठी बदल्यांच्या नावाखाली तब्बल शंभर कोटींच्या मलिद्याची जमवाजमव करण्यात आल्याची खमंग चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. काही अधिकार्‍यांनी तर कर्ज उचलून क्रीम पोस्टिंगसाठी योग्य स्थळी मलिदा पोहोचता केला आहे. यामधली त्याची चर्चा पोलीस महासंचालकांच्या कानावर गेल्यामुळेच त्यांनी बदल्यांच्या याद्यांवर सही करण्यास स्पष्ट नकार देऊन हात झटकले असल्याचे बोलले जात आहे. महासंचालकांच्या या कठोर भूमिकेमुळे एवढ्या मोठ्या मलिदाची जमवाजमव केलेल्या मंडळींशी पाचावर धारण बसली असल्याचे वृत्त आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी पोलीस आस्थापने मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील तीन वरिष्ठ पोलीस महासंचालकांचा समावेश असतो. या आस्थापने मंडळाचे अध्यक्षस्थान राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडे आहे तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि ज्येष्ठ सनदी पोलीस अधिकारी बिपिन कुमार सिंह, असे तिघे ज्येष्ठ पोलीस अधिकारी आस्थापने मंडळावर आहेत. मात्र, या आस्थापना मंडळांमध्ये ही सर्वात ज्येष्ठ पोलीस अधिकारी असलेले संजय पांडे यांचा समावेश नाही. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनाच या स्वतःच्या जबाबदारीवर वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. या बदल्या करताना काही वाद झाल्यास त्याची जबाबदारी राज्याचे पोलीस प्रमुख म्हणून पोलीस महासंचालकांवर येणार आहे.

राज्याच्या गृह मंत्रालयाने पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करताना त्या गुणवत्तेवर व कामाच्या निकषावर न करता स्वतःच्या नेत्यांच्या मर्जीतील पोलीस अधिकार्‍यांना झुकते माप देत बदल्या सुचवल्या असल्याचे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे मत आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या बदल्यांच्या यादीनुसार बदल केल्यास त्यामध्ये पोलीस महासंचालकांवर आरोप होऊ शकतात. तसेच गुणवत्ताधारक पोलीस अधिकार्‍यांना डावलले गेल्यास कोर्टबाजी देखील होऊ शकते. त्यामुळे या वादात अडकून स्वतःचे करिअर पणाला लावण्यापेक्षा पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहमंत्रालयाच्या यादीवर आपण सही करणार नाही. वाटल्यास मी रजेवर निघून जाईन, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. पोलीस महासंचालकांच्या या कडक पावित्र्याने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

महाआघाडी विकास सरकारमध्ये गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे तर सामान्य प्रशासन खाते हे शिवसेनेकडे अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. मात्र राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर निश्चित होत असतात. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणावर करत असताना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यातील बदल्यांबाबत मात्र वेगळाच सूर उमटू लागल्यामुळे राष्ट्रवादीतील अस्वस्थता अधिक वाढीस लागली आहे.

मुळातच राज्यात कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात सर्व सरकारी अधिकार्‍यांच्या बदल्यांना 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र ही स्थगिती जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उठवण्यात आली आणि 31 जुलैपर्यंत पंधरा टक्के अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात महाआघाडी विकास सरकारने मान्यता दिली. मात्र 31 जुलैपर्यंत ह्या बदल्यांबाबत एकमत होऊ न शकल्यामुळे दहा ऑगस्टपर्यंत दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली. तोपर्यंत सरकार आणि पोलीस महासंचालक यांच्यामध्ये पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत एकमत न झाल्याने 15 ऑगस्टपर्यंत तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळेला मात्र पोलीस महासंचालकांनी गृहमंत्रालयाकडून आलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या यादीवर सही करण्यात स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. या सार्‍या घडामोडींमुळे गृहखाते असलेल्या राष्ट्रवादीत मात्र प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

छगन भुजबळ, रणजित शर्मा यांना तुरुंगात धाडणारे हेच ते जयस्वाल
पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे राज्यातीलच नव्हे तर देशातील अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यकठोर आणि भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ असलेले पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ही त्यांनी माजी गृहमंत्री छगन भुजबळ तसेच मुंबई ते माजी पोलीस आयुक्त रणजित शर्मा, सह पोलीस आयुक्त श्रीधर वगळ त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे भुजबळांना मंत्रीपद सोडावे लागले तर रणजित शर्मांना तुरुंगात जावे लागले. जयस्वाल यांनी ‘रॉ’सारख्या संघटनेमध्ये त्यांच्या धडाडीच्या कामाची छाप उमटवली आहे. त्यामुळे जयस्वाल हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे ब्लू आईड बॉय म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. जयस्वाल यांना सेवानिवृत्त होण्यास अद्याप अडीच वर्षांचा कालावधी असून ते केंद्र सरकारच्या सेवेत जाण्यास अधिक इच्छुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील आपल्या कारकिर्दीला ते कोणताही डाग लावून घेऊ इच्छित नाहीत.

100 कोटींचा मलिदा?
मर्जीतील अधिकार्‍यांना क्रीम पोस्टिंग देण्यासाठी बदल्यांच्या नावाखाली तब्बल शंभर कोटींच्या मलिद्याची जमवाजमव करण्यात आल्याची खमंग चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. काही अधिकार्‍यांनी तर कर्ज उचलून क्रीम पोस्टिंगसाठी योग्य स्थळी मलिदा पोहोचता केला आहे. यामधली त्याची चर्चा पोलीस महासंचालकांच्या कानावर गेल्यामुळेच त्यांनी बदल्यांच्या याद्यांवर सही करण्यास स्पष्ट नकार देऊन हात झटकले असल्याचे बोलले जात आहे.

बदल्यांमध्ये स्वारस्य नाही-मुुख्यमंत्री
काही दिवसांपूर्वी मातोश्रीच्या निकटवर्तीय शिवसेनेतील एक ज्येष्ठ मंत्री स्वतःच, त्याच्या खात्यातील बदल्या करण्यासाठी मातोश्रीवर येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गळ घालत होते. मुख्यमंत्र्यांनी मात्र या मंत्र्याला बदल्यांमध्ये मला काडीमात्र स्वारस्य नाही, असे स्पष्टपणे बजावत बदल्यांची कामे माझ्याकडे आणू नका. गुणवत्तेच्या निकषावरच बदल्या होतील, असे स्पष्टपणे सुनावून परत पाठवून दिल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सध्या सुरू आहे.

First Published on: August 15, 2020 6:52 AM
Exit mobile version