अदनान सामीच्या पुरस्कारवरुन राजकारण

अदनान सामीच्या पुरस्कारवरुन राजकारण

अदनान सामी

गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता यावरुन राजकारण तापले आहे. या पुरस्काराला मनसेने विरोध केल्यानंतर आता राष्ट्रवादीने देखील यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर केंद्र सरकारच्या समर्थनार्थ भाजपने देखील मैदानात उडी मारल्याने आता यावरुन येत्या काळात राजकारण आणखी चिघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून या पुरस्काराला विरोध केला. मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेच ठाम मत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यात गायक अदनान सामी यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या घोषणेला अनेकांकडून विरोध करण्यात आल्यानंतर याला आता राजकीय वळण प्राप्त झाले आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या पुरस्काराला विरोध करताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेच ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे.

मनसेच्या विरोधानंतर आता राष्ट्रवादीने देखील त्याला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी हा विरोध दर्शविला आहे. मोदींजीचा जयघोष करेल त्याला या देशात नागरीकत्वासोबत पद्मश्रीने सन्मानित केले जाते, हा मोदींचा खरा चेहरा असून अदनान सामीला पुरस्कार देवून भारतीयांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

अदनान सामी यांना पद्मश्री दिल्याने भाजपाची नीती स्पष्ट होत आहे. मोदी आणि भाजप विचार करते त्यावेळी पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळते आणि त्या व्यक्तीला पद्मश्रीने सन्मानित केलं जातं परंतु आपण भारतीय असूनही त्यांना भारतीय असल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजपचे समर्थन
अदनान सामी यांना राष्ट्रपती पुरस्कार दिल्यामुळे काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आक्षेप जर घ्यायचाच होता तर त्यांना नागरिकत्व दिले तेव्हा आक्षेप घ्यायचा. भारताचे नागरिकत्व दिले तेव्हा आक्षेप नव्हता मग आता कशाला? भारतीय नागरिक म्हणून देशांनी स्वीकारले त्यानंतर त्यांनी चांगलं कार्य केले. म्हणून त्यांना पुरस्कार दिला गेला आहे, यात चूक काय? भाजपला मुस्लिम विरोधी समजत होते भाजपनेच मुस्लिमाना न्याय अधिक दिला आहे. पुरस्कार देताना जात धर्म पाहिले जात नाही. अदनान हे भारतीय आहेत. त्यांचे कार्य चांगले आहे म्हणून पुरस्कार देण्यात आला. विरोध करणे हे चुकीचे आहे, असे मत भाजप आमदार राम कदम यांनी व्यक्त केला आहे.

First Published on: January 28, 2020 6:47 AM
Exit mobile version