रोटरी बाल उद्यान नव्याने कात टाकतेय

रोटरी बाल उद्यान नव्याने कात टाकतेय

डोंबिवली । डोंबिवलीसारख्या दाट वस्तीच्या शहरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उद्याने फार कमी आहेत. त्यातच अनेक उद्यानाकडे महापालिकेमार्फत पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही, त्यामुळे उद्यानाची दुरावस्था होत असल्याचे पाहायला मिळते. डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी येथील रोटरी भवन जवळ असलेले रोटरी बाल उद्यान हे शहरातील सर्वात मोठे उद्यान आहे. या उद्यानाची देखभाल व्यवस्था रोटरी करीत असल्याने आता ते उद्यान नव्याने कात टाकत आहे.विशेष म्हणजे फुलपाखरु उद्यान देखील आकर्षक तयार करण्यात येत असल्याची माहिती रोटरी क्लब डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष रोटेरियन विजय डुंबरे आणि माधव सिंग यांनी दिली.

रोटरी गार्डनमध्ये असणार्‍या फुलपाखरू आणि आयुर्वेदिक उद्यान हे आबालवृद्धांचे अगदी आवडते ठिकाण म्हणून ओळखले जाते. कोविड काळात सुमारे दोन वर्षे हे उद्यान बंद होते. त्यामुळे देखभाल दुरुस्ती देखील करता आली नव्हती. आता नवीन सुधारणासह मुलांना खेळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपकरणे, लहान मुलांसाठी साहसी खेळ खेळण्याची सुविधा आणि ग्रीन झोन अशा प्रकारची रचना करून विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी निधी संकलन करण्यासाठी 23 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे प्रसिध्द गायक सुदेश भोसले यांच्या गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंधरा हजार स्क्वेअर फुटमध्ये पाच वर्षाच्या खालील मुलांसाठी वेगळे उद्यान आणि पाच वर्षांच्या वरील मुलांसाठी वेगळी रोटरी उद्यान अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. या उद्याना मध्ये नवीन खेळणी उपलब्ध केली आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा निधी आणि रोटरीच्या काही सदस्यांची मदत यातून या उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. कायापालट झालेल्या या नव्या उद्यानाचे उद्घाटन 25 डिसेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत ,सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष डुंबरे यांनी दिली.

First Published on: December 21, 2022 9:23 PM
Exit mobile version