‘त्या’ महिला तलाठयांच्या बदलीला स्थगिती

‘त्या’ महिला तलाठयांच्या बदलीला स्थगिती

नियम डावलून बदली केल्याप्रकरणी दाद मागणार्‍या महिला तलाठयाकडे येवल्याच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करत बदली प्रकरणी मॅटमध्ये धाव घेणार्‍या महिला तलाठयांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.

नियमबाहय पध्दतीने आपली बदली नांदगाव तालुक्यात करण्यात आली असून उपविभागीय अधिकार्‍यांच्या इच्छेला आपण दाद दिली नसल्यानेच त्यांनी आपली बदली केल्याचा आरोप संबंधित तलाठी महिलेने केला आहे. याप्रकरणी या महिलांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने २३ ऑगस्टपर्यंत बदलीला स्थगिती दिली होती. त्यानूसार सोमवारी यावर सुनावणी झाली. येवला तालुक्यातील महिला तलाठयांच्या बदल्या करताना सन २००५ च्या बदल्यांच्या कायद्यानुसार प्रांत अधिकारी येवला यांनी मुदतपूर्व बदल्या करतांना बदल्यांचा कायदा २००५ च्या कलम ४ (५) नुसार नजीकच्या वरीष्ठ सक्षम प्राधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी यांची पूर्व मान्यता घेतलेली दिसून येत नाही, त्यामुळे सदर बदल्या या कायद्याच्या कसोटीवर नियमबाहय आहेत, असे निरीक्षण मॅटच्या न्यायमुर्ती मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ सप्टेंबर २०२१ रोजी होणार असून प्रांताधिकारी येवला यांच्या ९ ऑगस्ट २०२१ रोजीच्या बदली आदेशाच्या अंमलबजावणीस मॅटने स्थगिती दिली आहे. महिला तलाठयांच्यावतीने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तीवाद केला तर राज्य शासनाच्यावतीने अ‍ॅड. क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.

First Published on: August 23, 2021 8:03 PM
Exit mobile version